कन्यादानाच्या आठवडाभर आधी चिंतातुर शेतमजुराने केला मृत्यू जवळ
By admin | Published: April 13, 2016 01:33 AM2016-04-13T01:33:07+5:302016-04-13T01:33:07+5:30
‘लक्ष्मी’च्या लग्नाची तयारी करून पित्याने घेतला अंतिम श्वास.
सचिन राऊत/अकोला
लाडक्या मुलीचे लग्न आठ दिवसांवर आले.. त्यासाठी मंडपापासून आचारी आणि इंधनाची सोय केली.. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहून गावकर्यांनीही मदतीचे आश्वासन दिले..; मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम नाही, अशा स्थितीत लग्नाचे कर्ज कसे फेडावे, या चिंतेतून एका शेतमजुराने मुलीच्या कन्यादानाच्या एक आठवडा आधीच मृत्यूला जवळ केले.
आकोट तालुक्यातील धारेल येथील शेषराव शहादेव ठोसरे (६0) हे गावातच शेतमुजरीचे काम करीत होते. त्यांना लक्ष्मी आणि उज्ज्वला या दोन मुली आहेत. त्यापैकी लक्ष्मीची रेशीमगाठ दर्यापूर तालुक्यातील रामगाव कोळंबी येथील उमेश इंगळे यांच्याशी जोडण्यात आली. शनिवार, १६ एप्रिल ही लग्नाची तारीख ठरली. लाडक्या लेकीच्या लग्नासाठी बापाने पै-पै जमा केलेल्या रकमेतून साक्षगंधाचा कार्यक्रम उरकण्यात आला. लग्नात मुलीला मंगळसुत्रासह आणखी काही दागिने देण्यासाठी ऐपतीनुसार तयारीही केली. मुलीचे लग्न एक-दोन आठवड्यावर आले असल्याने, लग्नाच्या स्वयंपाकासाठी त्यांनी लाकूडफाटा जमा केला. लग्नासाठी आचारी व मंडप सांगून त्यांना अँडव्हान्स म्हणून थोडीफार रक्कम देण्याचे आश्वासन दिले. या रकमेची जुळवाजुळव करण्यासाठी ठोसरे यांनी दोन-तीन दिवस पायपीट केली; परंतु पैशाची जुळवाजुळव होत नव्हती. मुलीच्या लग्नाचा दिवस मात्र जसजसा जवळ येत होता, तसतसा आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या पित्याचा धीर सुटत होता. पत्नी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करीत होता. मुलीचे लग्न चांगलेच होईल, असा विश्वास ती त्यांना द्यायची. पत्नी व मुलींकडे पाहून शेषराव मोठय़ा धीराने पुन्हा तयारीला लागले. शनिवार, ९ एप्रिल रोजी दुपारी त्यांनी पत्नी व मोठय़ा मुलीसोबत जेवण केले. मुलीच्या लग्नासाठी ठरलेल्या जागेची दुपारी ३ वाजताच्या सुमारास ते साफसफाई करीत होते. त्यांची पत्नी लग्नाची तयारी करण्यासाठी शेजार्यांकडे, तर मुलगी लक्ष्मी कामात होती. शेषराव ठोसरे यांच्या मनात परिस्थितीचे विचार घरघर करीत होते. या तणावतच त्यांनी घरात जाऊन अंगावर रॉकेल घेतले आणि स्वत: जाळून घेतले. ८0 टक्क्यांच्या वर जळालेल्या ठोसरे यांच्यावर सवरेपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. मुलीचे लग्न चार दिवसावर असतानाच सोमवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पित्याच्या मृत्यूने लक्ष्मीचे लग्न पुढे ढकलले असून, लहान मुलीच्या शिक्षणाचा प्रश्नही निर्माण झाला आहे.