राज्यात एक आठवडा 'वरुणराजा' विश्रांती घेण्याची शक्यता; कोकणात काही ठिकाणीच पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 07:53 PM2020-07-18T19:53:17+5:302020-07-18T19:55:14+5:30
१९ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
पुणे : राज्यात सध्या कोकण पट्ट्यातच पाऊस असून आवश्यक ढगनिर्मिती होत नसल्याने राज्यात पावसाच्या दृष्टीने अनुकूल स्थिती दिसून येत नाही. येत्या आठवड्यात राज्यात पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
पूर्व मध्य अरबी समुद्र, कर्नाटक -लक्षद्वीप किनारपट्टीलगत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेले काही दिवस कोकणात पाऊस होत होता़ हे कमी दाबाचे क्षेत्र आता कर्नाटक केरळ किनारपट्टीलगत आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.
याबाबत पुणेहवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, राज्यात आतापर्यंत मॉन्सूनचा पाऊस चांगला झाला असून सरासरीपेक्षा १८ टक्के अधिक पाऊस झाला आहे. सध्या मॉन्सून कोकणात सक्रीय आहे. ढगनिर्मितीची प्रक्रिया होत नसल्याने पुढील एक आठवड्यात राज्यात मोठ्या पावसाची शक्यता दिसून येत नाही. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे़ २४ जुलैपर्यंत ही स्थिती राहण्याची शक्यता आहे.
गेल्या २४ तासात कोकणातील मालवण १५०, रत्नागिरी १४०, मुलदे १३०, काणकोण, कुडाळ १२०, पणजी ११०, कपे, सावंतवाडी १००, दोडामार्ग, मडगाव, पेडणे, संगमेश्वर, देवरुख, वाल्पोई, वेंगुर्ला ९०, दाभोलीम, म्हापसा, सांगे ८०, कणकवली, लांजा, मार्मगोवा ७०, राजापूर ६० मिमी पावसाची नोंद झाली होती. याशिवाय अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला होता.
मध्य महाराष्ट्रातील राधानगरी ७०, गगनबावडा, महाबळेश्वर ५०, आजरा, चांदगड, लोणावळा, शाहूवाडी, वेल्हे ३०मिमी पाऊस झाला होता़ मराठवाड्यातील गंगापूर, फुलंब्री येथे १० मिमी पावसाची नोंद झाली होती़ तर विदर्भातील धारणी येथे ५०मिमी पाऊस पडला. घाटमाथ्यावरील ताम्हिणी ७०, शिरगाव, अम्बोणे, दावडी, डुंगरवाडी,कोयना, खोपोली ४० मिमी पाऊस झाला होता.
१९ जुलै रोजी कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.