तीन ठिकाणी आठवडी बाजार बंद

By Admin | Published: June 6, 2017 12:06 AM2017-06-06T00:06:55+5:302017-06-06T00:11:05+5:30

परभणी तालुक्यातील झरी, पेडगाव आणि पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील आठवडी बाजार रविवारी बंद ठेवून शेतकऱ्यांनी संपाची तीव्रता वाढविली.

Weekend market closes in three places | तीन ठिकाणी आठवडी बाजार बंद

तीन ठिकाणी आठवडी बाजार बंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी चौथ्या दिवशीही जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. परभणी तालुक्यातील झरी, पेडगाव आणि पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील आठवडी बाजार रविवारी बंद ठेवून शेतकऱ्यांनी संपाची तीव्रता वाढविली. तसेच पिंगळी येथे रास्ता रोको आंदोलन करीत शेतकऱ्यांनी भाजीपाला व दूध रस्त्यावर ओतून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
संपूर्ण कर्जमाफीच्या प्रश्नावर जिल्ह्यात १ जूनपासून शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. भाजीपाला व अन्य कृषी उत्पादने बाजारपेठेत विक्रीसाठी न नेता गावातच वाटली जात आहेत. रविवारीदेखील हा संप सुरु ठेवण्यात आला. परभणी शहरालगत असलेल्या ब्राह्मणगाव परिसरात किसान क्रांती समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी भाजीपाल्याची वाहने अडवून ती परत पाठविली. पिंगळी येथे सकाळी ९ वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे परभणी- पालम महामार्ग दोन तास ठप्प झाला होता. पिंगळी गावात शेतकऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. त्यानंतर शेतकऱ्यांनी भाजीपाला व दूध ओतून देऊन निषेध नोंदविला. पिंगळी विकास संघर्ष समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्ष संघटनांनीही संपात सहभाग घेतला. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाऊसाहेब गरुड, उमेश खाकरे, डी. डी. गरुड, ज्ञानराज पाटील, अंगद गरुड, सतीश खाकरे, गजानन गरुड, राज गरुड, अरुण साखरे, श्याम गरुड, सुंदर गरुड, अंकुश गरुड, शिवा दामोधर, शंकर गरुड, रावसाहेब गरुड आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यातील पेडगाव येथील बाजारपेठही रविवारी बंद पाळण्यात आली. पिंपळगाव, एकरुखा, ब्रह्मपुरी, वडगाव, किन्होळा, पान्हेरा, भोगाव, गव्हा, मोहपुरी, हसनापूर, कार्ला, तुळजापूर, गोविंदपूर, सारंगपूर, कुंभारी, आर्वी आदी १८ गावांतील शेतकरी येथे भाजीपाला विक्रीसाठी आणतात.
रविवारी सकाळी शेतकऱ्यांना बाजारपेठेत शेतमाल विक्री न करण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य टी. एम. देशमुख, गोविंद देशमुख, संतोष देशमुख, नारायण देशमुख, पंडित देशमुख, माणिक जेवणार, प्रसाद देशमुख आदींनी शेतकऱ्यांना आवाहन केले. त्यामुळे बैलगाडीने आणलेला शेतीमाल काही शेतकऱ्यांनी बाजार परिसरातच फेकून दिला. तर काहींनी गावाकडे परत नेला. दरम्यान, बाजार न भरल्याने सुमारे तीन लाख रुपयांचा व्यवहार ठप्प झाला.
झरी येथेही रविवारी आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला. या ठिकाणी जलालपूर, नांदापूर, पिंपळा, जवळा, मिर्झापूर, वाडी आदी गावांतील शेतकरी व ग्रामस्थ बाजारासाठी येत असतात. परंतु, अचानक बाजार बंद राहिल्याने ग्रामस्थांचे हाल झाले.
सोमवारीदेखील झरी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन बालाजी देशमुख, ओंकार सावंत, गजानन चव्हाण, अभिजीत परिहार, गजानन हेंडगे, अंकुश जोशी, किरण देशमुख आदींनी केले आहे.
ताडकळस येथेही आठवडी बाजार बंद ठेवून शेतकऱ्यांनी संपात सहभाग घेतला. बाजारात विक्रीसाठी आणलेला भाजीपाला रस्त्यावर टाकून देत निषेध व्यक्त करण्यात आला.

Web Title: Weekend market closes in three places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.