उसवल्या संसाराचा विणला धागा...
By admin | Published: June 12, 2016 03:55 AM2016-06-12T03:55:56+5:302016-06-12T03:55:56+5:30
ऐन तारुण्यात कोणाच्या नशिबी वैधव्य, कोणाचा काडीमोड झाल्याने माहेरी होणारी हेटाळणी, दुष्काळामुळे पतीने आत्महत्या केल्यानंतर वाट्याला आलेले एकटेपणाचे जगणे...! नियतीचे भोग सहन करत जीवन
- प्रताप नलावडे, बीड
ऐन तारुण्यात कोणाच्या नशिबी वैधव्य, कोणाचा काडीमोड झाल्याने माहेरी होणारी हेटाळणी, दुष्काळामुळे पतीने आत्महत्या केल्यानंतर वाट्याला आलेले एकटेपणाचे जगणे...! नियतीचे भोग सहन करत जीवन कंठणाऱ्या अशा कित्येकींचे फाटके संसार सावरले साध्या शिलाई यंत्रांनी! ‘नाम’ व सिद्धिविनायक संस्थेच्या मदतीने पिंपळनेर (ता. बीड) येथे वंचित महिला आता स्वत:च्या पायावर उभ्या राहात आहेत.
दुष्काळी स्थितीत आत्महत्येचा मार्ग स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी, परित्यक्त्या व गोरगरीब महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी सिद्धिविनायक सेवाभावी संस्थेने पिंपळनेर येथे प्रशिक्षण केंद्र उघडले. महिलांच्या दृष्टीने सहज, सोपे असलेले विणकाम, शिलाईकाम, मेहंदी आदी प्रशिक्षण देण्याचा निर्णय संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवप्रसाद चरखा व इतर पदाधिकाऱ्यांनी घेतला. संस्थेने दहा शिलाई यंत्रे विकत घेतली. पाच प्रशिक्षित महिला नेमण्यात आल्या असून, त्यातून महिलांना शिवणकामाचे मोफत प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. त्यासाठी पिंपळनेर परिसरातील ३० गावांचा सर्व्हे करण्यात आला. यातून गरजू महिलांची निवड करण्यात आली.
अभिनेता नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम’ संस्थेकडे विधवा, परित्यक्त्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी शिलाई यंत्रे उपलब्ध करण्याचा प्रस्ताव ठेवला. ‘नाम’ने ‘सिद्धिविनायक’ संस्थेचे कामकाज पाहून प्रस्ताव मान्य केला. फेबु्रवारीमध्ये ‘नाम’ने ११५ शिलाई यंत्रे पाठवून दिली.
२० महिलांची एक बॅच अशा पद्धतीने दोन बॅचला एकाच वेळी प्रशिक्षण देण्यात आले. प्र्रशिक्षणासोबतच शिलाई यंत्रही मिळाल्याने वंचित महिलांच्या उसवलेल्या संसाराचा धागा विणलाय.
कामाची उपलब्धता अन् योग्य मोबदला
- या महिलांना शाळांच्या गणवेशाची कामे संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जात आहेत. काही संस्थांनी आॅर्डर दिल्या असून, आणखी काही संस्थांशी पत्रव्यवहार सुरू आहे. या महिलांना घरच्या घरी शिवणकामे मिळवून देतानाच, योग्य तो मोबदला देण्यासाठीही ‘सिद्धिविनायक’ संस्थेने पुढाकार घेतला आहे.