भारनियमनाचे सावट!
By admin | Published: October 5, 2014 01:03 AM2014-10-05T01:03:29+5:302014-10-05T01:03:29+5:30
सध्या राज्यात निर्माण झालेल्या कोळसा व गॅसच्या तुटवड्यामुळे सर्वत्र भारनियमनाचे सावट पसरले आहे. यामुळे महावितरण कंपनीला रोज सुमारे दोन ते अडीच हजार मेगावॅट वीजपुरवठा कमी होत
कोळसा-गॅसचा तुटवडा : उत्पादन घटले
नागपूर : सध्या राज्यात निर्माण झालेल्या कोळसा व गॅसच्या तुटवड्यामुळे सर्वत्र भारनियमनाचे सावट पसरले आहे. यामुळे महावितरण कंपनीला रोज सुमारे दोन ते अडीच हजार मेगावॅट वीजपुरवठा कमी होत असल्याची माहिती पुढे आली आहे.
माहिती सूत्रानुसार, महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पामधून किमान ५,५०० मेगावॅट विजेचे उत्पादन अपेक्षित असताना, तेथून केवळ चार ते साडेचार हजार मेगावॅट विजेचे उत्पादन होत आहे.
महानिर्मितीला वीजनिर्मितीसाठी रोज किमान ३२ रेक्स कोळशाची गरज असते. मात्र सध्या या कंपनीला केवळ १५ ते १६ रेक्स कोळसा मिळत आहे. त्याचा परिणाम वीज उत्पादनावर होऊन ते घटले आहे. खापरखेडा, चंद्रपूर, पारस व भुसावळ येथील प्रकल्पात फारच कमी कोळसा शिल्लक राहिला आहे. सोबतच इंडिया बुल्सकडूनही कोळशाअभावी २७० मेगावॅट वीज कमी मिळत असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. याशिवाय गॅस पुरवठ्यासंबंधी विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. यात रत्नागिरी येथील १९५० मेगावॅटचा गॅस प्रकल्प बंद पडला आहे. तसेच उरण गॅस केंद्रातील १५० मेगावॅट वीजनिर्मिती कमी झाली आहे. खाजगी प्रकल्पापैकी अदानी प्रकल्पातून सुमारे अडीच हजार मेगावॅट वीज अपेक्षित असताना, ती गत काही दिवसांपासून केवळ १५०० ते १७०० मेगावॅट वीज मिळत आहे.
दुसरीकडे गत १५ दिवसांत विजेच्या मागणीत एक ते दीड हजार मेगावॅटने वाढ झाली आहे. १५ दिवसांपूर्वी राज्यात सुमारे १४ हजार ५०० ते १५ हजार ५०० मेगावॅट विजेची मागणी होती. परंतु ती आता १६ हजार ५०० ते १६ हजार ८०० मेगावॅटपर्यंत वाढली आहे.
महावितरण ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्रीय विद्युत एक्सचेंजकडून रोज सुमारे १००० ते १४०० मेगावॅट वीज खरेदी करीत आहे. याशिवाय निविदा प्रक्रियेतून ३०० मेगावॅट विजेची व्यवस्था केली जात आहे. (प्रतिनिधी)