वजन-मापे निर्माते, दुरुस्तकांचे परवाने रद्द

By Admin | Published: July 27, 2015 12:47 AM2015-07-27T00:47:00+5:302015-07-27T00:47:00+5:30

वैध मापनशास्त्र विभागाने क्षुल्लक कारणे दाखवून राज्यातील ४००० वजन-मापे निर्माते व दुरुस्तक (देखभाल, दुरुस्ती करणारे) यांचे परवाने तडकाफडकी

Weight-scales manufacturers, cancellation of licenses | वजन-मापे निर्माते, दुरुस्तकांचे परवाने रद्द

वजन-मापे निर्माते, दुरुस्तकांचे परवाने रद्द

googlenewsNext

सोपान पांढरीपांडे, नागपूर
वैध मापनशास्त्र विभागाने क्षुल्लक कारणे दाखवून राज्यातील ४००० वजन-मापे निर्माते व दुरुस्तक (देखभाल, दुरुस्ती करणारे) यांचे परवाने तडकाफडकी रद्द केल्याने प्रचंड असंतोष पसरला आहे. त्यामुळे काही उद्योजकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठासमोर याचिका दाखल केली आहे.
राज्यात वैध मापनशास्त्र विभागाचे एकूण ५३०० परवानाधारक होते. त्यापैकी २५० परवानाधारक उत्पादक होते. ५००० परवानाधारक वजन, मापे, तराजू यांची देखभाल व दुरुस्ती करणारे व विक्रेते होते. हे परवाने साधारणत: एक वर्षाकरिता दिले जातात व त्यांचे नूतनीकरण १ जानेवारीपूर्वी होत असते. यावर्षी मात्र या सर्व उद्योजकांनी डिसेंबर-२०१४ मध्ये नूतनीकरणासाठी अर्ज केले; त्यापैकी काही मोजक्या परवान्यांचे नूतनीकरण झाले व इतर परवाने प्रलंबित राहिले व जून-जुलैमध्ये वैध मापनशास्त्र विभागाने सर्व परवाने एका झटक्यात रद्द केले.
परवाना नसल्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून या उद्योजकांचा व्यवसाय बंद होता. आता परवानेच रद्द झाल्याने हे उद्योजक आणि त्यांचे कामगार-कर्मचारी उपासमारीच्या वाटेवर आहेत. वैध मापनशास्त्र विभागाविरुद्ध प्रचंड असंतोष उफाळला असला तरी भीतीपोटी कुठलाही उद्योजक उघडपणे बोलायला तयार नाही. अधिक चौकशी केली असता हे संकट वैध मापनशास्त्र विभागाचे नवे नियंत्रक संजय पांडे यांनी कामकाजात अचानक सुरू केलेल्या सुधारणांमुळे उभे झाले असल्याचे समोर आले.
आॅक्टोबर २०१४ मध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर पांडे यांनी व्यवस्था बदलासाठी एका पाठोपाठ एक परिपत्रके काढणे सुरू केले व त्यामुळे सर्वच परवानाधारक त्रस्त झाले. पांडे यांनी काढलेली २२ आॅक्टोबर व २७ आॅक्टोबरची परिपत्रके मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द ठरविली आहेत. एका परिपत्रकाद्वारे पांडे यांनी दुरुस्तकांना सरकारी फी वसूल करण्यावर बंदी घातली होती तर दुसऱ्या परिपत्रकाद्वारे फी वसूल केली तर लायसन्स रद्द करण्याचे फर्मान काढले होते. नागपूर विभागात वैध मापनशास्त्र विभागाचे ५० परवानाधारक आहेत. त्यापैकी ४५ परवाने रद्द झाले आहेत.
यासंबंधी संजय पांडे यांना संपर्क केला असता त्यांनी ४००० परवाने रद्द केल्याचे मान्य केले. आमच्या विभागाकडे अतिशय संवेदनशील असे काम आहे. वजने, मापे, वे ब्रिजेस किंवा धरमकाटे यांनी अतिशय शास्त्रशुद्ध आणि तंतोतंत वजन किंवा आकार दाखवलाच पाहिजे. एका मशीनमध्ये लहानसा बिघाड झाला तरी हजारो/लाखो ग्राहकांचे नुकसान होते. त्यामुळे आम्ही अतिशय काटेकोरपणे ‘काम करतो’, असे ते म्हणाले. यापूर्वी आमच्या विभागात तंतोतंत वजन मापे व गुणवत्ता यावर भर दिला जात नव्हता, म्हणून चीनमधून तकलादू सुटेभाग आणून भारतात उत्पादकांनी इलेक्ट्रॉनिक वजन काटे बनवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आम्हाला अधिक कडक नियम बनवावे लागले आहेत, असे ते म्हणाल आपल्या सुधारणा उद्योजकांना त्रास न देता होऊ शकत नाही काय या प्रश्नावर पांडे म्हणाले, उद्योजकाला अन्याय झाला असे वाटत असेल तर त्याने सरळ माझ्याकडे दाद मागायला हवी. मी सर्वांना न्याय देण्याचे वचन देतो. आपला कारभार एवढा पारदर्शी आहे तर उद्योजक कोर्टात का गेले, या प्रश्नावर मात्र पांडे यांच्याकडे उत्तर नव्हते.

Web Title: Weight-scales manufacturers, cancellation of licenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.