वेरूळ लेणीकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष
By admin | Published: April 18, 2016 01:30 AM2016-04-18T01:30:36+5:302016-04-18T01:30:36+5:30
भारतीय शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून वेरूळ लेणीकडे पाहिले जाते. युनेस्कोने १९८३मध्ये अजिंठा व वेरूळ लेणी जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. मात्र, मागील
- मुजीब देवणीकर, औरंगाबाद
भारतीय शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून वेरूळ लेणीकडे पाहिले जाते. युनेस्कोने १९८३मध्ये अजिंठा व वेरूळ लेणी जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. मात्र, मागील काही वर्षांपासून केंद्रीय पुरातत्व विभागाकडून या लेण्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने जगप्रसिद्ध वारशाची दुरवस्था होत चालली आहे.
औरंगाबाद शहरापासून अवघ्या ३० कि.मी.वरील खुलताबाद तालुक्यात वेरूळ गाव वसले आहे. सरळ रेषेत वसलेल्या एकूण ३४ लेण्यांमध्ये बौद्ध चैत्य दालने, प्रार्थना गृहे, विहार किंवा आश्रम, तसेच हिंदू आणि जैन मंदिरे यांचा समावेश आहे. पाचव्या शतकापासून ते अकराव्या शतकापर्यंत लेणी कोरण्यात आल्या आहेत. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या या लेण्यांच्या देखभाल, दुरुस्तीकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. येथील कोरीव कामांच्या सुरक्षेसाठी कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
दोन महिन्यांपूर्वी एका चित्रपटाचे चित्रीकरण या परिसरात करण्यात आले. कलाकार येथील विविध मूर्र्तींवर बसून शूटिंग करीत होते, हा प्रकार धक्कादायकच होता. त्यापूर्वी लेणी परिसरातील अवैध उपाहारगृहात झालेल्या सिलिंडरच्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला होता. या स्फोटामुळे लेणींना तडा गेल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला होता. जागतिक वारसा दिनानिमित्त वेरूळ लेणीत ‘लोकमत’ प्रतिनिधीने फेरफटका मारला असता, अत्यंत विदारक चित्र पाहायला मिळाले. ३४ लेणींमधील अनेक मूर्र्तींचे हात-पाय गायब झाले आहेत. लेणींच्या प्रवेशद्वाराजवळील हत्तींचीही तोडफोड झाली आहे.
वेरूळ, अजिंठा व इतर पर्यटनस्थळांची सोईस्करपणे वाट लावण्याचे काम केंद्रीय पुरातत्व, राज्य पुरातत्व आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ करीत आहे. पर्यटन वाढावे या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत. अनमोल वारसा जपण्यासाठी फारसे परिश्रम शासकीय यंत्रणांकडून घेतले जात नाही. त्यामुळे वेरूळ येथील मूर्र्तींची पडझड होत आहे. - महेंद्र ठोंबरे, उपाध्यक्ष, टुरिस्ट गाईड असोसिएशन
औरंगाबादेत येणाऱ्या पर्यटकांचा ओघ
वर्षपर्यटक संख्याविदेशी पर्यटक
२००६-०७१७,९१, ४६९६९,१५९
२००७-०८२२,९५,४५९७६,८१६
२००८-०९२५,१५,३४१५९,६१५
२००९-१०२९,९९,४५८८०,३७९
२०१०-११३५,१९,६५६८६,७२५
२०११-१२ ३९,३७,६४५९१,१४२
२०१२-१३४४,०९,९७८९६,९४४
२०१३-१४३९,५१,०५२७६,५१६
२०१४-१५३९,८९,७४१७७,३८५
२०१५-१६३८,५५,०७७५४,०००
(आकडे जानेवारीपर्यंत)