महाराष्ट्राची शान वाढविणाऱ्यांना आगळावेगळा सलाम!
By admin | Published: April 7, 2017 05:20 AM2017-04-07T05:20:02+5:302017-04-07T05:20:42+5:30
समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या "लोकमत"च्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे
मुंबई : आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या "लोकमत"च्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे. "लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर" पुरस्काराच्या यंदाच्या संभाव्य विजेत्यांच्या चर्चेबरोबरच "जय महाराष्ट्रीयन"चा हुंकार पुन्हा घुमू लागला आहे.
शिवाय सन्माननीय माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची विशेष उपस्थिती हा परमोच्च बिंदू असणाऱ्या, येत्या मंगळवारी मुंबईत होणाऱ्या या सोहळ््याचे यंदाचे रूप कसे असणार याविषयीचे कुतुहलही शिगेला पोहोचले आहे.
या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी "लोकमत"ने सुरू केलेल्या पुरस्काराची एव्हाना परंपरा झाली आहे. यंदाच्या चौथ्या पर्वातही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रीयनांना प्रगतीपथावर नेणाऱ्यांमधून लोकमत"महाराष्ट्रीयन आॅफ द इयर" चे मानकरी ठरविण्याची प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात आली आहे. "लोकमत"च्या संपादकीय चमूने केलेले मंथन, जगभरातील कोट्यवधी वाचक तसेच नामवंत ज्युरींचा कौल यातून विजेत्यांची निवड साकारत आहे. १४ क्षेत्रांमधील प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या मान्यवरांप्रमाणेच राज्याच्या कानाकोपऱ्यात इतरांना प्रेरणादायी ठरेल, अशा कार्याचे बीज पेरणाऱ्यांचाही शोध या निमित्ताने घेतला गेला. समाजमनावर प्रभाव टाकणाऱ्या तसेच विकास आणि समृद्धीच्या वाटचालीत भर टाकलेल्या नानाविध क्षेत्रांमधील प्रतिभेचा आरसा म्हणून युपीएल प्रायोजित "लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर" पुरस्कारांकडे पाहिले जात आहे.
ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
यंदा मोलाची भर...: आता चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट््स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" यातील एकंदर १३ कॅटेगरींसह "वैद्यकीय" क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या १४ पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
>सन्मान संध्या रंगणार ‘सहारा स्टार’मध्ये
‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’चे पुरस्कार प्रदान करण्याची सन्मान संध्या मुंबईतील सांताक्रुझ विमानतळाजवळील सहारा स्टार हॉटेलमध्ये रंगणार आहे. केवळ निमंत्रितांसाठी असलेला हा सोहळा मंगळवार ११ एप्रिलला सायंकाळी ५.३० वाजता सुरू होईल.
>गौरवशाली इतिहास लाभलेल्या आपल्या राज्याला आज अनेक क्षेत्रांत आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आव्हाने मोठी असली तरी त्याने खचून न जाता दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगून अनेक लोक कार्यरत आहेत. अशांच्या कार्याचा यथोचित गौरव करीत असतानाच त्यांच्याविषयी महाराष्ट्राच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना त्यामागे आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या कर्तृत्त्ववान मान्यवरांचा सन्मान करतानाच इतरांसाठी प्रेरणेचा स्त्रोत ठरू शकणाऱ्या पण, प्रसिद्धीच्या झोतात न आलेल्या कानकोपऱ्यातील माणसांचाही भाषा-वेशभूषा, संस्कार-संस्कृती, जात-पात यांच्यापलीकडे जाऊन गुणगौरव करण्याचा वसा आम्ही घेतला आहे.
- विजय दर्डा, अध्यक्ष,
लोकमत मीडिया प्रा. लि.
>महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दडलेली गुणवत्ता हेरून महाराष्ट्राचा अभिमान वाढविणाऱ्यांचा सन्मान प्रक्रियेचा एक भाग होणे आमच्यासाठी आनंददायी आहे. समाजाला दिशा देणाऱ्या सेवाव्रतींच्या गौरवात सलग दुसऱ्या वर्षी पुरस्कर्त्यांच्या रूपात सहभागी होताना आनंद होत आहे. त्याचवेळी महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमानही द्विगुणीत होत आहे.
- डॉ. अजिंक्य डीवाय पाटील,
चान्सलर, अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे
>लोकमताचा उदंड प्रतिसाद
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.