जयसिंंगराव पवार यांच्या शाहू ग्रंथाचे जर्मनीत स्वागत
By Admin | Published: August 19, 2015 01:04 AM2015-08-19T01:04:33+5:302015-08-19T01:04:33+5:30
सुधीर पेडणेकरांचा अनुवाद : वाचकांना ग्रंथ उपलब्ध करून देण्याचा जर्मन विद्यापीठाचा मानस
कोल्हापूर : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार लिखित शाहू ग्रंथाचे जर्मनीत उत्साही स्वागत करण्यात आले आहे. गतवर्षी १२ नोव्हेंबरला शाहू गं्रथाच्या जर्मन आवृत्तीचे प्रकाशन जर्मन कौन्सुल जनरल मायकेल सिबर्ट यांच्या हस्ते विद्यापीठात झाले होते. या ग्रंथाचा जर्मन भाषेतील अनुवाद स्वित्सर्लंड येथे वास्तव्यास असलेले कोल्हापूरचे सुपुत्र सुधीर पेडणेकर यांनी केला होता. पेडणेकर यांनी हा अनुवादित जर्मन शाहू ग्रंथ भारतविद्या विषयावर संशोधन सुरू असलेल्या सर्व विद्यापीठांना सप्रेम भेट म्हणून पाठवलेला होता. यामध्ये बर्लिन, बॉन, फ्रीबर्ग, गॉटिगजेन, विटेनबर्ग, हम्बर्ग, हायडलबर्ग, लिपझिक, आदी ठिकाणच्या विद्यापीठांचा समावेश आहे. या सर्वच विद्यापीठांतून या ग्रंथाचे स्वागत करण्यात आले आहे. गं्रथाच्या जर्मनीतील स्वागताबाबतची पत्रे पेडणेकर यांनी महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीला पाठवली आहेत. हा ग्रंथ अभ्यासकांना व सर्वसामान्य वाचकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे जर्मन विद्यापीठांनी म्हटले आहे. हायडलबर्ग विद्यापीठाच्या इंडॉलॉजी (भारतविद्या) विभागाचे प्रमुख डॉ. एलनोर स्मिट यांनी या ग्रंथामुळे आमच्या ग्रंथसंग्रहात मोलाची भर पडली आहे. हा ग्रंथ आम्ही विद्यापीठाचे अभ्यासक आणि जर्मनीमधील सर्व अभ्यासकांसाठी ई - लायब्ररी तसेच इंटर लायब्ररी - लोन सिस्टम या सुविधांच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे, असे म्हटले आहे. शाहंूचे चरित्र जगभर पोहचावे असे वाटते, अशा शाहूप्रेमींसाठी ही आनंदाची बाब आहे.
शाहू ग्रंथाची रशियन,हिंदी आवृत्ती लवकरच
शाहू- ग्रंथ अभियानांतर्गत लवकरच शाहू ग्रंथाच्या हिंदी व रशियन आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे. हिंदी अनुवाद प्रा. डॉ. पद्मा पाटील व रशियन अनुवाद प्रा. डॉ. मेघा पानसरे आणि प्रा. तत्याना बीकवा यांनी केला आहे. महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या माध्यमातून देशात आणि परदेशात शाहू चरित्राचा प्रसार करण्याचे अभियान डॉ. पवार यांनी सुरू केले आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत कन्नड, कोकणी, इंग्रजी, जर्मन, उर्दू, तेलगू आदी भाषांत शाहू ग्रंथ प्रकाशित झाला आहे. उर्दू व तेलगू भाषेतील ग्रंथाचे ५ जुलैला हैद्राबाद येथे प्रकाशन झाले आहे.