‘लक्ष्मीच्या पावलांनी’ लेकीचे स्वागत
By admin | Published: November 1, 2015 01:40 AM2015-11-01T01:40:48+5:302015-11-01T01:40:48+5:30
येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या ‘लक्ष्मीचे पाऊल’ उपक्रमामुळे ‘बेटी बचाओ’ चळवळीला बळ मिळत आहे. मुलगी झाल्यास नि:शुल्क प्रसूती सेवा दिली जात आहे.
- भीमगोंडा देसाई, कोल्हापूर
येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या ‘लक्ष्मीचे पाऊल’ उपक्रमामुळे ‘बेटी बचाओ’ चळवळीला बळ मिळत आहे. मुलगी झाल्यास नि:शुल्क प्रसूती सेवा दिली जात आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी कोल्हापूर जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
‘मुलगाच वंशाचा दिवा’ या भ्रामक समजुतीमुळे स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे सर्वच घटकांतून ‘मुलगी वाचवा’ अभियान राबविले जात आहे. विविध प्रकारे मुलींच्या जन्माचे स्वागत केले जात आहे. शासन व प्रशासनाच्या स्तरावरून जाणीवपूर्वक, नियोजनबद्धरीत्या विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘सेव्ह द बेबी गर्ल’, ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत जागृृती केली जात आहे. ‘लेक वाचवा’ अभियानांतर्गत रुग्णालयीन प्रसूतीचे प्रमाण वाढविणे, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करणे, या दृष्टीने कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे दोन महिन्यांपासून ‘लक्ष्मीचे पाऊल’ हा उपक्रम राबविला जात आहे.
या उपक्रमासाठी जिल्ह्यातील आठ रुग्णालयांची निवड केली आहे. संबंधित रुग्णालयात नैसर्गिक प्रसूतीद्वारे मुलगी झाली, तर सर्व सेवा मोफत आहेत. मुलगा झाला तर फक्त एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येते.
सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्यास, औषधे व सर्व उपचारांसह ४ हजार ५०० रुपये घेतले जातात. जोखमीच्या गरोदर मातांना व बालकांवर आवश्यक उपचार केले जातात. उपक्रम सुरू झाल्यानंतर आॅगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांत ७५ प्रसूती झाल्या. यापैकी १२ नैसर्गिक, ६२ सिझेरियन, गुंतागुंतीची एक होती.
जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी आरोग्य विभागातर्फे ‘लक्ष्मीचे पाऊल’ हा उपक्रम राबविला जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. उपक्रमांतर्गत निवडलेल्या रुग्णालयांत उपचार घेतल्यामुळे प्रसूतीसाठीचे पैसे वाचत आहेत.
- अविनाश सुभेदार,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर