मलालाचे भारतात स्वागतच करु - शिवसेना
By Admin | Published: October 21, 2015 01:06 PM2015-10-21T13:06:29+5:302015-10-21T13:09:51+5:30
नोबेल पुरस्कार विजेती युसूफजाई मलालाने दहशतवादाविरोधात लढा दिला असून ती भारतात आल्यास शिवसेना तिचे स्वागतच करेल असे स्पष्टीकरण शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - नोबेल पुरस्कार विजेती युसूफजाई मलालाने दहशतवादाविरोधात लढा दिला असून ती भारतात आल्यास शिवसेना तिचे स्वागतच करेल असे स्पष्टीकरण शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहे. शिवसेनेला शत्रू समजणा-या मंडळींनी आधी पाकिस्तानमध्ये काय सुरु आहे हे बघावे आणि मग आमच्यावर टीका करावी असेही त्यांनी विरोधकांना सुनावले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून पाकिस्तानी गायक गुलाम अली, माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद कसुरी आणि भारत - पाकिस्तान क्रिकेट मालिकेला शिवसेनेने कडाडून विरोध दर्शवला आहे. शिवसेनेच्या या आंदोलनावर सर्वत्र टीका होत असून नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफजाई ही भारतात आली तर शिवसेना विरोध दर्शवणार का असा सवालही उपस्थित होत होता. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.
मलाला युसूफजाई या लहान मुलीने दहशतवादाविरोधात लढा दिला व यासाठी तिने दहशतवाद्यांच्या गोळ्याही झेलल्या आहेत. अजूनही मलालाचा संघर्ष सुरुच आहे.शिवसेनेने मलालाचे नेहमीच कौतुक केले असून ती भारतात आल्यास तिचे स्वागतच करु असे त्यांनी सांगितले. दहशतवादाविरोधात लढणा-या शिवसेनेवर पाकिस्तानमध्ये बंदीची मागणी केली जाते आणि जमात उद दावासारख्या संघटनेला मोकळीक दिली जाते, यातून आता भारतानेच धडा घ्यावा असेही त्यांनी म्हटले आहे.