मोदींसाठी स्वागताचे गालिचे
By admin | Published: May 18, 2014 12:27 AM2014-05-18T00:27:30+5:302014-05-18T00:27:30+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मोदींना स्वत:हून अभिनंदनाचा फोन केला आणि अमेरिका भेटीचे रीतसर निमंत्रणही दिले.
Next
>ओबामांचा फोन : अमेरिका भेटीचे निमंत्रण; चीनचाही स्वागताचा खलिता
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचा (नाकारलेला) व्हिसा या बहुसंख्यांच्या मनात रुतलेल्या घावाबद्दल अनेकानेक टिप्पण्ण्या व्हॉट्सअॅपवरून फिरत असतानाच्या विजय-रात्रीच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मोदींना स्वत:हून अभिनंदनाचा फोन केला आणि अमेरिका भेटीचे रीतसर निमंत्रणही दिले. जगातील सर्वात जुनी आणि सर्वात विशाल लोकशाही असलेले दोन्ही देश यापुढच्या काळात परस्पर सहकार्याचे नवे मानदंड निर्माण करतील
असा विश्वासही ओबामांनी व्यक्त केल्याचे कळते.
स्वजनांच्या संहाराचा, अतिरेकी धार्मिक दुजाभावाचा आरोप ठेऊन ज्यांना अमेरिकेने आपली दारे बंद केली आणि अति-उजव्या विचारसरणीचा, एककल्ली नेतृत्वाचा दोषारोप ठेऊन स्वदेशातल्या बुद्धिवाद्यांसह परदेशातल्या विचारवंतांनी, नेते आणि मुत्सद्यांनी आजवर ज्यांच्याकडे संशयाने पाहिले असे मोदी भारतातल्या सत्तासोपानाची पायरी चढण्यास सज्ज झाल्यावर जागतिक नेत्यांनी त्यांच्यासाठी स्वागताचे गालिचे अंथरले आहेत. जगातल्या सर्वात मोठय़ा लोकशाही राष्ट्रातल्या जनतेने दिलेल्या भरभक्कम जनादेशाचे अत्यंत उत्साहात स्वागत अनेक बडय़ा राष्ट्रांच्या प्रमुखांनी नव्या सरकारला मैत्रीचा हात देत
नव्या स्नेहपूर्ण सहकाराची आशा व्यक्त केली आहे. इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी मोदींना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले आणि ‘लूकिंग फॉरवर्ड टू मीट यू’ म्हणत लंडन भेटीचे निमंत्रणही दिले.
भारत आणि अमेरिका या दोघांमधील परस्पर भागीदारीचे दीर्घकालीन संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने भविष्यात एकत्रितपणो काम करण्यासंबंधी दोन्ही नेत्यांमध्ये सौहार्दपूर्ण चर्चा झाली आहे. दोन्ही देश परस्पर सहकार्याची व्याप्ती आणि खोली वाढवण्यासाठी अधिक जोमाने कार्यरत राहातील.
- प्रवक्ता, व्हाइट हाऊस, वॉशिंग्टन डीसी
भारतीय निवडणुकीवर मी स्वत: बारकाईने लक्ष ठेवून होतो, तुमचा सगळा प्रवास मी अत्यंत उत्सुकतेनं पाहिला आहे.
- नवाज शरीफ, पंतप्रधान, पाकिस्तान
भारत-इस्त्रयल संबध अधिक दृढ होण्यासाठी आपण परस्पर सहकार्य
करू, आपले नाते अधिक सक्षम होईल अशी आशा आहे.
- बेंजामिन नेत्यानहू, पंतप्रधान, इस्रायल