नववीच्या पुनर्परीक्षेचे शिक्षकांकडून स्वागत
By admin | Published: April 28, 2017 12:24 AM2017-04-28T00:24:38+5:302017-04-28T00:38:06+5:30
दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी दिली जात असून शासननिर्णयानुसार आता नववीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या
प्राची सोनवणे / नवी मुंबई
दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी दिली जात असून शासननिर्णयानुसार आता नववीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पुनर्परीक्षेची संधी दिली जाणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा शाळा स्तरावर घेतली जाणार आहे. या शासननिर्णयाचे मुंबई विभागातील शिक्षक परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले असून विद्यार्थी गळती शून्यावर येणार असा दावा या वेळी करण्यात आला.
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून नववी आणि दहावीमधील विद्यार्थ्यांच्या गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांच्या नैदानिक चाचण्या जुलै महिन्यात घेतल्या जाणार आहे. या चाचणीच्या निकालावरून ज्या विद्यार्थ्यांना नववी आणि दहावीमध्ये उत्तीर्ण होण्यात अडचणी येऊ शकतात अशा विद्यार्थ्यांना जलद शिक्षण पध्दतीचा अवलंब करून उत्तीर्ण होण्याकरिता आवश्यक त्या प्रकारची मदत शिक्षकांकडून केली जाणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांमधील अडचणी दूर करण्याकरिता राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, राज्य मंडळ आणि विद्या प्राधिकरणामार्फत विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. नैदानिक चाचण्या विद्या प्रधिकरणामार्फत तयार केल्या जाणार असून या चाचण्या शाळांमध्ये घेण्याची जबाबदारी ही राज्य मंडळाची असणार आहे. सर्व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता नववीमधील गरजू विद्यार्थ्यांना जलद गतीने शिक्षणाच्या पध्दती अमलात आणल्यावर देखील जर काही विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असतील तर अशा विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. २०१७-१८ या वर्षाकरिता पुनर्परीक्षा जून २०१८मध्ये होणार असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.