आरोग्यमंत्र्यांच्या निर्णयाचे पॅथॉलॉजिस्टकडून स्वागत
By admin | Published: September 18, 2016 03:03 AM2016-09-18T03:03:53+5:302016-09-18T03:03:53+5:30
गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याची माहिती राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली.
मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याची माहिती राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली. डेंग्यूची साथ आल्याने पॅथॉलॉजी लॅब अव्वाच्या सव्वा पैसे आकारत असून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले. डेंग्यूच्या चाचण्यांचे खोटे अहवाल (पॉझिटिव्ह) देणे, रुग्णांकडून अधिक पैसे आकारणे अशा गैरप्रकारांमागे राज्यभरात बोगस पॅथॉलॉजी लॅबचे पसरलेले जाळे कारणीभूत असल्याचा आरोप महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टकडून करण्यात आला आहे.
राज्यात डेंग्यूच्या रुग्णांना आळा घालणे आवश्यक आहे. डेंग्यूला आळा घालण्यासाठी जिल्हा, शहर पातळीवर विविध उपाययोजना राबविल्या जातात. या योजनांची अंमलबजावणी पावसाळ्याच्या आधीपासून केली जाते. तरीही डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यावर पॅथॉलॉजी लॅबकडून रुग्णांची लूट केली जात असून, त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय आरोग्यमंत्र्यांनी घेतला. या निर्णयाला पॅथॉलॉजिस्ट संघटनेचा पाठिंबा आहे. (प्रतिनिधी)