वैष्णवांच्या मेळ्याचे स्वागत
By admin | Published: June 29, 2016 01:28 AM2016-06-29T01:28:19+5:302016-06-29T01:28:19+5:30
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...’ या अभंगांनुसार पालखी प्रस्थानापूर्वी देहूनगरीत वृक्षारोपण करण्यात आले.
निगडी : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...’ या अभंगांनुसार पालखी प्रस्थानापूर्वी देहूनगरीत वृक्षारोपण करण्यात आले. स्वच्छ सुंदर अर्थात निर्मल वारीचा संकल्प झाला. टाळ-मृदंगाचा जयघोष आणि हरिनामाचा गजर करीत संतश्रेष्ठ तुकोबारायांचा पालखीसोहळा मंगळवारी सायंकाळी पाचला उद्योनगरीत प्रवेशिला. वरुणाचा अभिषेक आणि उद्योगनगरीने वैष्णवांच्या मेळयाचे मनोभावे स्वागत केले.
ऊन-सावलीचा खेळ, अधून-मधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी अशा आल्हाददायक वातावरणात विठूनामाचा गजर करीत पालखीसोहळा वारीची वाट चालू लागला आहे. इनामदारवाड्यातील आजोळघरी मुक्काम करून मंगळवारी सकाळी अकराला सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाला. तत्पूर्वी सकाळी साडेआठला आजोळघरी इनामदारवाड्यात जिल्हाधिकारी सौरव राव, मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या हस्ते महापूजा केली. या वेळी देवस्थानाचे अध्यक्ष शांताराम मोरे, सोहळाप्रमुख सुनील मोरे, अशोक नि. मोरे, अशोक मोरे, बीडीओ संदीप कोहिनकर, प्रांताधिकारी स्रेहल बर्गे, हवेलीचे तहसीलदार किरणकुमार काकडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वैशाली नागवडे, देहूगावच्या सरपंच हेमा मोरे आदी उपस्थित होत्या.
महापूजेनंतर ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे...’ या अभंगानुसार वैष्णवांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प सोडला.
गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणपूरक, स्वच्छ, सुंदर निर्मल वारीचा संकल्प करण्यात आला. त्यानंतर देहूकरांचा निरोप घेऊन वैष्णव वारीची वाट चालू लागले. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. अधून-मधून हलक्याशा पावसाच्या सरी बसरत होत्या. त्यामुळे वैष्णवांच्या भक्तीचा रंग अधिकच गहिरा होत होता. प्रवेशद्वारावर पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. अनगडशाहवलीबाबा दर्गा येथे दुपारचा विसावा झाला. पहिल्या अभंगआरतीनंतर पालखी सोहळा आकुर्डीच्या दिशेने निघाला. दुपारी अडीचच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली.
पाऊस असतानाही वारकऱ्यांच्या उत्साहात तसूरभरही कमतरता जाणवली नाही. चिंचोली, देहूरोडमध्ये लष्करी जवानांच्या वतीने ब्रिगेडियर देवेन पटेल यांनी दिंडीप्रमुखांचे स्वागत केले. तसेच देहूरोड कॅन्टोन्मेंट आणि सीओडी आणि डीओडीच्या कामगारांनी वारकऱ्यांची सेवा केला. त्यानंतर पालखी सोहळा मुंबई-पुणे महामार्गाने पिंपरी-चिंचवडकडे मार्गस्थ झाला. दुसरीकडे पालखी सोहळा अनुभवण्यासाठी निगडी भक्ती-शक्ती चौक येथे मोठ्या प्रमाणावर भाविक जमलेले होते. उद्योनगरीतून महापालिका, प्राधिकरण आणि विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने वारकऱ्यांच्या स्वागतासाठी कक्ष उभारलेले होते. ध्वनिक्षेपकावर विठ्ठलभक्तीचा महिमा सांगणारी गीते सुरू होती. त्यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते.
सायंकाळी पाचच्या सुमारास नगारा आणि चौघडा उद्योनगरीत प्रवेशिला. त्यानंतर साडेपाचच्या सुमारास रथ आला. तिथे शहराच्या वतीने उपमहापौर महापौर शकुंतला धराडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समितीचे सभापती डब्बू आसवानी यांनी सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर सोहळा निगडी टिळक चौकमार्गे आकुर्डीतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोहोचला. अभंगारतीनंतर सोहळा विसावला. बुधवारी पहाटे साडेसहाला सोहळा पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे.
सोहळा मुंबई-पुणे महामार्गाने पिंपरी एचए कॉलनीतील विठ्ठल मंदिरात पहिला विसावा त्यानंतर दापोडीत दुपारचा विसावा होणार असून, बोपोडी, खडकी, वाकडेवाडीमार्गे सोहळा पुण्यात मुक्कामासाठी थांबणार आहे.
(वार्ताहर)
>महापालिका : दिंडीप्रमुखांचा सत्कार
महापालिकेच्या वतीने दिंडीप्रमुखांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली. या वेळी विविध शाळांची दिंडीपथके सहभागी झाली होती. तसेच पोलीस मित्र संघटनेचे कार्यकर्ते पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते. विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी प्रसादवाटप, पाणीवाटप, चहापाणी, चप्पलदुरुस्ती, आरोग्य तपासणी, वैद्यकीय उपचार अशा विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात येत होत्या.