युतीचे कल्याण
By admin | Published: November 7, 2015 04:07 AM2015-11-07T04:07:28+5:302015-11-07T04:07:28+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले शिवसेना आणि भाजपा आता एकत्र आले असून, शुक्रवारी याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला.
अखेर जमले : महापौरपद अडीच वर्षांसाठी वाटून घेणार !
मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले शिवसेना आणि भाजपा आता एकत्र आले असून, शुक्रवारी याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला.
बिहारमधील विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल भाजपाच्या विरोधात जात असताना मित्रपक्षाला दुखावण्याची जोखीम भाजपा घेऊ इच्छित नाही. त्यामुळेच कल्याण-डोंबिवलीतील प्रचाराची कटुता विसरून शिवसेनेला सोबत घेण्याचे भाजपामध्ये ठरले. कल्याणमध्ये शिवसेनेला बाजूला सारून सत्तेचे गणित मांडले तर राज्याचा कारभार करताना शिवसेनेकडून असहकार्य आणि विरोधाची भूमिका घेतली जाईल व त्यातून कटुता वाढेल. त्यापेक्षा युती करून वाद मिटविण्याचा विचार भाजपाने केला, असे म्हटले जात आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यात आज सायंकाळी बैठक झाली. त्याआधी दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. युतीसाठी सर्वांनीच अनुकूलता दर्शविली. (विशेष प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांची भूमिका युतीची
शिवसेनेला विचारात न घेता मनसे, अपक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादीत फोडाफोडी करून सत्ता मिळवावी, असा आग्रह भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांचा होता. मात्र प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असता शिवसेनेला सोबत घेतले पाहिजे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र महापौरपद आधी भाजपालाच हवे, याबाबत मुख्यमंत्री आणि दानवे आग्रही आहेत.