कल्याणच्या माने यांची ‘माउंट एलब्रुस’वर स्वारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 12:15 AM2019-08-08T00:15:47+5:302019-08-08T06:27:54+5:30
स्वातंत्र्यदिनी मोहीम; ७३ भारतीय ध्वजांचे बांधणार तोरण
डोंबिवली : युरोपातील सर्वोच्च शिखर ‘माउंट एलब्रुस’ सर करण्याचा पराक्रम कल्याणमधील गिर्यारोहक निलेश माने ७३ व्या स्वातंत्रदिनी करणार आहेत. यावेळी ते ७३ भारतीय ध्वजांचे तोरण बांधून नवा विक्रम करणार असून त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या पराक्रमादरम्यान त्यांच्यासोबत मुंबईतील काळाचौकी येथील वैभव ऐवळे असून शुक्रवारी ते मुंबईतून मोहिमेसाठी रवाना होणार आहेत.
निलेश हे कल्याण पूर्वेत राहत असून नाहूर येथे एका कंपनीत नोकरी करतात. निलेश हे प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवर शिखर सर करणार आहेत. निलेश यांचे आजोबा, काका आणि वडील सैन्यदलात होते. निलेश यांनाही सैन्यात जायचे होते. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यानंतर, त्यांनी गिर्यारोहणाची आवड जोपासली. निलेश यांनी वयाच्या अठराव्या वर्षापासून आतापर्यंत महाराष्ट्रातील जवळजवळ ७० ते ८० गड, किल्ले, सुळके, सह्याद्रीच्या रांगा सर केल्या आहेत.
या मोहिमेसाठी निलेश आणि वैभव या दोघांना एकत्रित सहा लाख ६० हजार रुपये खर्च आहे. त्यासाठी त्यांनी वैयक्तिक कर्ज घेतले असून निलेश यांना दीड लाखांपर्यंतच्या आर्थिक मदतीची गरज आहे. त्यासाठी त्यांनी कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनीता राणे आणि स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला आहे. निलेश आणि वैभव यांचा सातही खंडांतील शिखर सर करून तेथे भारतीय ध्वज फडकावण्याचा विश्वविक्रम करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
मोहिमेचा रविवारी झाला ‘फ्लॅग ऑफ’
शहरातील गिर्यारोहक निलेश माने हे युरोपमधील सर्वोच्च शिखर माउंट एलबु्रस सर करणार आहेत. भारतीय सैन्याला ही मोहीम त्यांनी समर्पित केली आहे. या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे, असे मत माजी सैनिक रवींद्र माने यांनी व्यक्त केले. माने व त्यांचे सहकारी वैभव ऐवळे यांच्या मोहिमेचा फ्लॅग ऑफ रविवारी सकाळी माजी सैनिक कार्यालय येथे माजी सैनिकांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माने बोलत होते. निलेश यांनी आपली मोहीम भारतीय सैन्याला तर, वैभव यांनी ही मोहीम बलात्कारविरोधी चळवळीला समर्पित केली आहे. या मोहिमेसाठी बनविलेल्या खास बॅनरचे अनावरणही करण्यात आले. या कार्यक्रमासाठी माजी सैनिक अनंत कदम, माजी सैनिक विविध सहकारी मर्यादित संस्थेचे अध्यक्ष अनंत आंब्रे आदी मान्यवर उपस्थित होते. अनंत कदम म्हणाले, माजी सैनिकांना ही मोहीम समर्पित क रणे ही खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही सैनिक सेवेत असताना बर्फाच्छादीत शिखरांवर तैनात होऊन देशाची सेवा करीत असू. त्याचाच एक भाग होण्याचा प्रयत्न निलेश आणि वैभव याही मोहिमेतून करत आहेत, असे सांगितले.
‘माउंट एलबु्रस’विषयी
माउंट एलबु्रस हे युरोप खंडातील सर्वाेच्च शिखर असून त्याची उंची १८ हजार ५१० फूट (५६४२ मीटर) असून काळा समुद्र आणि कॅस्पियन समुद्राच्या मधोमध हे शिखर आहे. या शिखराचे वैशिष्ट्य म्हणजे हा एक निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहे. तेथील तापमान उणे २५ डिग्रीपर्यंत आहे. वर्षभर येणारी सततची वादळे, हाडे गोठवणारी थंडी यामुळे माउंट एलबु्रसची मोहीम अवघड आहे.
निलेश यांनी ही मोहीम भारताच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या भारतीय लष्कराला समर्पित करण्याचा मानस व्यक्त केला आहे. या मोहिमेचा शुभारंभ कल्याणमधील माजी सैनिकांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रविवारी कल्याणमध्ये झेंड्याचे अनावरण माजी सैनिकांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर, ९ आॅगस्टला मुंबईतून मोहिमेला प्रारंभ होईल. ११ ते १५ आॅगस्ट या कालावधीत शिखर सर केले जाणार आहे.