खैरे, अहिर, गिते, आढळराव, अडसूळ होते मंत्रीपदाच्या शर्यतीत !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 02:32 PM2019-08-09T14:32:36+5:302019-08-09T14:46:00+5:30
द्रकांत खैरे, हंसराज अहिर, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते आणि आनंदराव अडसूळ यांचा पराभव विचार करायला लावणारा आहे. हे पाचही नेते मंत्रीपदाच्या शर्यतीत होते.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शानदार विजय मिळवला. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीने आपली कामगिरी कायम राखत, विजयी घोडदौड केली. परंतु, लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले. या दिग्गजांमध्ये सत्ताधारी पक्षातील नेत्यांचाही समावेश होता. या दिग्गजांच्या पराभवावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी लक्ष वेधले. त्यामुळे चंद्रकांत खैरे, हंसराज अहिर, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते आणि आनंदराव अडसूळ यांचा पराभव विचार करायला लावणारा आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे अजूनही पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. पराभवाला पक्षातील काही पदाधिकारी जबाबदार असल्याचे त्यांचे मत आहे. मात्र राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे कार्यकर्ते नव्हे तर शिवसेना आणि भाजपची संपूर्ण यंत्रणाच खैरे यांच्या पराभवासाठी कार्यरत होती का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी इम्तियाज जलील कारणमात्र होते, असंही नमूद केले. शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते. परंतु, त्यांचाच पराभव झाल्यामुळे मंत्रीपदाच्या चर्चांवर अपसुखच पडदा पडला.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या वेळेस शिवसेनेचे काही खासदार त्यांनी मंत्री म्हणून नको होते नेमके तेच लोकं पाडले गेले, अमरावतीमध्ये आनंदराव अडसुळ पडले, आढळराव पाटील, अनंत गीते पडले... आणि काँग्रेसचा एक खासदार जो शिवसेनेत होता आणि काँग्रेसमध्ये गेला नेमका तोच खासदार निवडून आला.
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) August 9, 2019
भाजपचे ज्येष्ठ नेते हंसराज अहिर यांच्याविषयीही असंच झालं अशी शक्यता व्यक्त होत आहे. आतापर्यंत भाजपचा गड असलेल्या चंद्रपूरमध्ये बाळू धानोरकर यांच्या रुपाने काँग्रेसने आपला झेंडा रोवला आहे. १५ वर्षांनंतर काँग्रेसने ही जागा मिळविली आहे. ऐनवेळी शिवसेनेत दाखल झालेल्या धानोरकरांनी केंद्रीयमंत्री हंसराज अहिर यांना पराभूत केले. अहिर यांचा पराभव भाजपलाच हवा होता, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. हंसराज आहिर कॅबिनेट मंत्रीपदाचे दावेदार होते.
शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरूर मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी पराभूत केले. त्यांच्या पराभवाचे नियोजन देखील भाजप-शिवसेनेनेच केले होते, असा दावा राज ठाकरे यांनी केला. आढळराव पाटील देखील मंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार होते. हीच स्थिती आनंदराव अडसूळ आणि अनंत गिते यांच्याविषयी झालं. हे दोघेही मंत्रीपदासाठी दावेदार होते. त्यामुळेच त्यांचा पराभव घडवून आणला गेल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.