कोरेगाव भीमा येथे मानवंदनेसाठी अलोट भीमसागर : शांततेत विजयदिन अभिवादन 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 07:55 PM2019-01-01T19:55:27+5:302019-01-01T20:05:59+5:30

गेल्या वर्षी विजयदिनाच्या दिवशी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कडकोट नियोजन करण्यात आले आहेत.

well crowd of Bhimasagar at Koregaon Bhima for Vijayadin greetings in peaceful | कोरेगाव भीमा येथे मानवंदनेसाठी अलोट भीमसागर : शांततेत विजयदिन अभिवादन 

कोरेगाव भीमा येथे मानवंदनेसाठी अलोट भीमसागर : शांततेत विजयदिन अभिवादन 

ठळक मुद्देसामाजिक सौहार्दाचे दर्शन,  कडेकोट पोलीस बंदोबस्त, लाखो कार्यकर्त्यांमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी 

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादनासाठी मंगळवारी (दि.१ जाने.) लाखोंचा भीमसागर लोटला. ग्रामस्थांनी गुलाबपुष्पासह अल्पोपहार देऊन केलेल्या स्वागताने सामाजिक सौहार्दाचे अनोखे दर्शन घडले. 
गेल्या वर्षी विजयदिनाच्या दिवशी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कडकोट नियोजन करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांपासून वरिष्ठ पोलीस अधिकारी ठाण मांडून होते. दहा हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी होते. मात्र, प्रचंड मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली. मात्र, तरीही कार्यकर्त्यांनी शांततेत आणि समजुतदारपणे पोलीसांना सहकार्य केले. कोणत्याही प्रकारचा गोंधळ झाला नाही. 


कोरेगाव भीमा येथे काल रात्री बारा वाजल्यापासूनच कार्यकर्ते जथ्थ्याने येत होते. विजय स्तंभाला फुलांची आकर्षक सजावट केली होती. रात्री बारा वाजता सामुहिक बुध्दवंदेनेने अभिवादन कार्यक्रमास सुरूवात झाली. सकाळी नऊ वाजता महार रेजीमेंटच्या निवृत्त १०० जवांनानी आणि समता सैनिक दलाच्या पाचशे जवानांनी संचलन करून मानवंदना दिली.   रिटायर्ड महार रेजिमेंटच्या १०० जवानानी, भारतीय बौद्ध महासभेप्रणीत समाता सैनिक दलाच्या ५०० सैनिकांनी संचलन करुन सलामी दिली. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर , रिपब्लिकन सेना प्रमुख आनंदराव आंबेडकर, पिपल्स पाटीर्चे राष्टीय अध्यक्ष प्रा. जोगेद्र कवाडे,  खासदार अमर साबळे, गृहराज्य मंत्री दीपक केसरकर, भारतीय बौद्ध महासंघाचे कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर यांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.  
नगर बाजुने सणसवाडी येथे तर पुण्याच्या बाजूने लोणीकंद येथे वाहन तळाची सोय केली होते. येथून पुढे खासगी वाहनांना बंदी होती. कार्यकर्त्यांसाठी पीएमपी बसची व्यवस्था करण्यात आली  होती. ती पण अपुरी पडल्याने कार्यकर्ते पायीच विजयस्तंभाकडे निघाले होते. वाघोलीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांच्या वाहनातूनही नागरिकांना विजयस्तंभाकडे नेले जात होते. 
गेल्या वर्षी झालेल्या दंगलीमुळे  गावाला लागलेला ठपका पुसण्याचा निर्धार परिसरातील ग्रामस्थांनी केला होता. मानवंदनेसाठी येणाºया समाजबांधवांचे कोरेगाव-भीमा, पेरणे, शिक्रापूर, अष्टापूर, लोणीकंद या गावांतील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन येणाऱ्या समाजबांधवांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात  येत होते. त्यांच्यासाठी पाणी, नाश्त्याची व्यवस्था केली होती. सुमारे १ लाख नागरिकांना पोह्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामस्थांच्या या स्वागताने या ठिकाणी येणा-या नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. 
स्थानिक नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे अभिवादनाचा कार्यक्रम शांततेत यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला, असे सांगत जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा अधिक्षक संदिप जाधव यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. 
 गर्दीच्या नियमनास प्रथम प्राधान्य देण्यात आले. पोलिसांना समता सैनिक दल व गावागावातील शांतीदुतांची मोठ्या प्रमाणावर मदत होत असल्याचे कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. 
अभिवादन सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी वाघोली आणि शिक्रापूरपासूनच कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पेरणे फाट्यापासून धातूशोधक यंत्रातून तपासणी करूनच सोडले जात होते. रस्त्यावर ठिकठिकाणी बॅरीकेडींग करण्यात आले होते. तब्बल पाच हजार पोलीस कर्मचारी, बारा राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, घातपातविरोधी सात चमू, बाराशे होमगार्ड, दोन हजार स्वयंसेवक, आठ सहाय्यक पोलीस अधीक्षक, ३१ जिल्हा पोलीस उपअधीक्षक, १२६ पोलीस निरीक्षक, ३६० सहायक पोलीस निरीक्षक असा कडेकोट बंदोबस्त तैनात असेल. चाळीस व्हिडिओ कॅमेरे, ३०६ सीसीटीव्ही, बारा ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जात होते. 

.......................
रामदास आठवले यांची सभा आणि चंद्रशेखर आझाद यांची रॅली 
केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांची दुपारी एक वाजता सभा होती. दुपारी तीनच्या सुमारास आठवले पुण्याहून निघाल्याचेही समजले. मात्र, त्याच वेळी उत्तर प्रदेशातील नेते चंद्रशेखर आझाद यांची रॅली पुण्याहून निघाली. त्यातच प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने ही सभा होऊच शकली नाही. 

Web Title: well crowd of Bhimasagar at Koregaon Bhima for Vijayadin greetings in peaceful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.