सुसज्ज चित्रनगरी हीच अनंत मानेंना आदरांजली

By admin | Published: September 1, 2015 10:40 PM2015-09-01T22:40:40+5:302015-09-01T22:40:40+5:30

चित्रपट व्यावसायिकांचा निर्धार : अनंत माने स्मृती चित्रपट महोत्सवाला शानदार प्रारंभ

Well equipped painting is just like Ananta Mannena Daryanjali | सुसज्ज चित्रनगरी हीच अनंत मानेंना आदरांजली

सुसज्ज चित्रनगरी हीच अनंत मानेंना आदरांजली

Next

कोल्हापूर : दिग्दर्शक अनंत माने हे मराठी चित्रपटसृष्टीला प्रभातकाळी पडलेले स्वप्न होते. विक्रम करणाऱ्या चित्रपटांचे दिग्दर्शन, पडत्या काळातही मराठी चित्रपटांना जगवणाऱ्या माने यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची स्थापना झाली. कोल्हापूर चित्रनगरी उभारली; पण आता ती कोमात आहे. या चित्रनगरीला ऊर्जितावस्था आणून येथील मातीत रूजलेला चित्रपट व्यवसाय जोमाने चालविणे हीच अनंत मानेंना खरी आदरांजली ठरणार आहे, असे मत व्यक्त करीत चित्रपट व्यावसायिकांनी सुसज्ज चित्रनगरीचा निर्धार केला. दिग्दर्शक अनंत माने यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने मंगळवारपासून अनंत माने स्मृती चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी हा संकल्प करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर, उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, कार्यवाह सुभाष भुरके, अनंत माने यांचे चिरंजीव चंद्रकांत माने, मुलगी वैजयंती भोसले, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, दिग्दर्शक भास्कर जाधव, तंत्रज्ञ कोयाजी यमकर, शुभांगी साळोखे, आदी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी रसिकांनी हाऊसफुल्ल गर्दी करून चित्रपटांचा आस्वाद घेतला. भास्कर जाधव म्हणाले, अनंत माने फारसे शिकलेले नसले, तरी ‘प्रभात’, ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’, ‘नवयुग’ या संस्था त्यांचे विद्यापीठ होते. ‘सांगत्ये ऐका’ या चित्रपटाने केलेला १३१ आठवड्यांचा विक्रम आजवर हिंदी चित्रपटसृष्टीलाही मोडता आलेला नाही असे दर्जेदार चित्रपट त्यांनी दिले आहेत. सुसज्ज चित्रनगरी हे त्यांचे स्वप्न होते. सर्व चित्रपट व्यावसायिकांनी एकत्र येऊन चित्रनगरी उभारण्यासाठी शासनाला भाग पाडणे हीच खरी आदरांजली ठरणार आहे.
महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर म्हणाले, मराठी चित्रपटसृष्टीचा पाया रचलेल्या अनंत माने यांची जन्मशताब्दी माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आली हे मी भाग्य मानतो. त्याचवेळी ज्या महनीय व्यक्तींनी मराठी चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ दिला त्यांच्यासारखे काम आम्हाला करता आले नाही किंवा त्यांनी मिळविलेले संचित आम्हाला जपता आले नाही, याची खंत आहे आणि जबाबदारीची जाणही आहे.
चंद्रकांत जोशी म्हणाले, आनंदराव पेंटर यांनी या मातीत चित्रपट रुजविण्याचे स्वप्न पाहिले. त्यानंतर शंभर वर्षे झाली तरी हे स्वप्न अपुरे राहिले हे दुर्दैव आहे. त्याकाळी कलेला राजाश्रय मिळाला. आता राजे नाहीत, शासनातील लोकनेते फक्त सुसज्ज चित्रनगरीचा जयघोष करतात. या मातीने इतिहास घडवला. अनंत मानेंनी चित्रपटसृष्टीच्या खडतर १५ वर्षांच्या काळात मराठी चित्रपट जगवला, तगवला.
यावेळी अभिनेत्री उषा नाईक यांनी अनंत माने यांनी माझ्यातील कलागुण हेरून मला अभिनेत्री म्हणून पुढे आणले,आमच्यात गुरू-शिष्याचे नाते होते. आजही मी त्यांचा आशीर्वाद घेऊन वाटचाल करत असल्याचे सांगितले. सुभाष भुरके यांनी प्रास्ताविक केले. ऐश्वर्या बेहेरे यांनी सूत्रसंचलन केले. उद्घाटनानंतर ‘सांगत्ये ऐका’ या चित्रपटाने महोत्सवाला प्रारंभ झाला. दिवसभरात ‘धाकटी जाऊ’,रंगपंचमी’ हे चित्रपट दाखविण्यात आले. (प्रतिनिधी)


'लोकमत'च्या पुढाकाराने मिळाली गती
अनंत माने यांच्या जन्मशताब्दी वर्षाला २२ सप्टेंबर २०१४ ला सुरुवात झाली. मात्र, त्यांनी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाचा जणू सर्वांनाच विसर पडला होता. ‘लोकमत’ने मात्र या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून सलग आठ दिवस अनंत माने यांच्या चित्रपट कारकिर्दीवर आधारित विशेष पुरवणी व मान्यवरांचे लेख प्रसिद्ध केले. चित्रपट व्यावसायिकांच्या परिसंवादाच्या संयोजनातही पुढाकार घेतला. त्यावेळी व्यावसायिकांनी माने यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या विषयाला गती मिळाली.

सुरेख रंगमंच... पोस्टर्स प्रदर्शन
शाहू स्मारक भवनच्या प्रवेशद्वारात अनंत माने यांच्या गाजलेल्या चित्रपटांची पोस्टर्स व छायाचित्रे लावली होती. व्यासपिठावर ‘सुशीला’, ‘सांगत्ये ऐका’, ‘मानिनी’, ‘केला इशारा जाता-जाता’, ‘पाहुणी’ या चित्रपटांची पोस्टर्स लावली होती, तर मुख्य सभागृहात दादासाहेब फाळके, कलामहर्षी बाबूराव पेंटर, व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर यांचे छायाचित्र लावले होते. या सगळ््या नेपथ्यामुळे शाहू स्मारकचा परिसर चित्रपटमय झाला होता.

Web Title: Well equipped painting is just like Ananta Mannena Daryanjali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.