विहिरी-कुपनलिका दुरुस्तीची मोहीम
By Admin | Published: May 17, 2016 04:19 AM2016-05-17T04:19:36+5:302016-05-17T04:19:36+5:30
पालिकेने १२८ विहिरींची सफाई केली असून नव्याने १६८ कुपनलिका उभारल्या आहेत.
ठाणे : शहराला सध्या पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्याने ठाणे महापालिकेने पिण्याच्या पाण्याचा वापर इतर कामांसाठी होऊ नये म्हणून यासाठी उपलब्ध असलेल्या नैसर्गिक स्त्रोतांवर भर देण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार शहरात असलेल्या विहिरी आणि कुपनलिकांची दुरुस्तींची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत पालिकेने १२८ विहिरींची सफाई केली असून नव्याने १६८ कुपनलिका उभारल्या आहेत. त्यामुळे या पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी होऊ लागला आहे.
ठाणे शहराला आजघडीला रोज सुमारे ४८० एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या ते मुबलक असतांनादेखील प्रत्येक मंगळवारी शहरातील आणि बुधवार गुरुवारी कळवा, मुंब्रा परिसराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. परंतु, उपलब्ध असलेल्या याच पाण्याचा वापर ठाणेकर गाड्या धुणे, बगिचांना पाणी घालणे आणि इतर कामांसाठी करीत आहे. तसेच महापालिकादेखील यापूर्वीच याच पाण्याचा आधार घेत होती.
परंतु, २०१० मध्ये ठाणे महापालिकेने शहरात असलेल्या नैसर्गिक स्त्रोतांकडे लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले. त्यानुसार शहरात असलेल्या परंतु, दूषित झालेल्या विहिरींची शोध मोहीम हाती घेतली होता. त्यानुसार शहरात विविध भागात ५५५ सार्वजनिक विहिरी असल्याची माहिती समोर आली होती. यातील काही पडीक, वापरात नसणे,
कचऱ्याने निर्माण झालेली
दुर्गंधी, तर काही विहिरी कोरड्या पडल्या होत्या.
काहींमध्ये गटारांचे पाणी गेल्याने ४० टक्के भूर्गभजलातील पाणी
साठा हा अशा विविध कारणांमुळे दूषित झाल्याची माहितीही पालिकेच्या सर्व्हेत पुढे आली
होती. त्यामुळे वापरात नसलेल्या विहिरींची संख्या ही २१६ वर गेली आहे. यामुळे सध्या वापरात
असलेल्या विहिरींची संख्या ही ३३९ वर आली आहे. त्यातील पाण्याच्या साठ्याचे मोजमाप हे ८.७ दशलक्ष लीटर आहे. यातील १.८ दशलक्ष
लीटर पाणी हे वापरास अयोग्य तसेच ते पिण्यास अयोग्य असल्याचाही निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे ज्या विहिरी उपलब्ध आहेत. त्यातील पाणी आता महापालिका उपयोगात आणत आहे.
त्यानुसार पालिकेने यंदा
सध्याच्या पाणीटंचाईच्या काळात या विहिरी इतर कामांसाठी वापरात आणण्याचे निश्चित करुन त्या तील गाळ काढण्याचे काम सुरु झाले आहे. त्यात आतापर्यंत १२८ विहिरांचा गाळ काढून त्या वापरात आणल्या गेल्या आहेत. तर उर्वरित विहिरींची साफसफाईची कामे येत्या २० मे पर्यंत पूर्ण होतील, असा दावा पालिकेने केला आहे.
(प्रतिनिधी)
>१६८ नव्या कूपनलिका
या विहिरींबरोबरच शहरात असलेल्या कुपनलिका दुरुस्त करण्याची मोहिमही देखील तीव्र केली आहे. शहरात १३७० सार्वजनिक कुपनिलिका आहेत. त्यातील ७८६ कुपनलिका या हातपंपासहीत असून त्यांच्या वापर झोपडपट्टी भागातील रहिवासी करीत आहेत.
२२४ कुपनलिका विद्युत पंपासह असून त्यांचा वापर सार्वजनिक उद्याने, महापालिकेच्या शाळा, अग्निशमन केंद्रे, रुग्णालये, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी केला जात आहे. पालिकेच्या सार्वजनिक शौचालयांत ३६० कुपनिलिकांचा वापर केला जात आहे.
दरम्यान सध्याची पाणीटंचाई लक्षात घेऊन पालिकेने मागील वर्षी ठरविलेल्या नियोजनानुसार आतापर्यंत नव्याने १६८ कुपनिलका खोदल्या असून त्यातील ९२ कुपनलिकांचा वापर झोपडपट्टी परिसरातील रहिवाशांना होत आहे. ४२ कुपनलिकांचा वापर सार्वजनिक उद्याने, अग्निशमन केंद्रे व स्मशानभूमी याठिकाणी होत आहे. परंतु, ३४ कुपनलिकांना पाणी न लागल्याने त्या बंद ठेवल्या आहेत.