शहरीकरणाचे सुनियोजित व्यवस्थापन आवश्यक
By admin | Published: September 12, 2016 04:28 AM2016-09-12T04:28:55+5:302016-09-12T04:28:55+5:30
स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागाला डोळयासमोर ठेवून धोरणे तयार करण्यात आलीत. गावांचे रूपांतर शहरात होत गेले व अनेक नागरी समस्यांनी मोठे स्वरूप घेण्यास सुरुवात केली
नागपूर : स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागाला डोळ््यासमोर ठेवून धोरणे तयार करण्यात आलीत. गावांचे रूपांतर शहरात होत गेले व अनेक नागरी समस्यांनी मोठे स्वरूप घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता भविष्याची गरज लक्षात घेता ग्रामीण भागासोबत शहरांच्या विकासालाही प्राधान्य देण्याची गरज असून शहरीकरणाचे सुनियोजित व्यवस्थापन आवश्यक आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
‘लोकमत महाचर्चा एनएमसी-एनआयटी व्हीजन २०२० (नागपूरचा विकास : समस्या, अपेक्षा व नियोजन)’ या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
रविवारी कामठी रोड येथील ‘ईडन ग्रीन्ज’ येथे आयोजित या महाचर्चेच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या ‘एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन विजय दर्डा, खा.अजय संचेती, खा.विकास महात्मे, आ.कृष्णा खोपडे, आ.सुधाकर देशमुख, आ.विकास कुंभारे, आ.सुधाकर कोहळे, आ.अनिल सोले, आ.प्रकाश गजभिये, आ.जोगेंद्र कवाडे, महापौर प्रवीण दटके, पोलीस आयुक्त के.वेंकटेशम्, नासुप्र सभापती दीपक म्हैसेकर, ‘ओसीडब्लू’चे मुख्य प्रवर्तक अरुण लखानी, पूनम रिसॉर्टचे व्यवस्थापकीय संचालक एन.कुमार उपस्थित होते. समारोप सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.
वृत्तपत्रे अनेकदा प्रश्न मांडतात; परंतु केवळ प्रश्न मांडून परिवर्तन होत नाही. त्यांची उत्तरे शोधावी लागतात. तेव्हाच लोकशाहीचा खरा विकास होतो. ‘लोकमत’ने या महाचर्चेच्या आयोजनातून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला आहे व हे स्वागतार्ह आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. ते म्हणाले, शहरांमध्ये रोजगारानिमित्त येणाऱ्यांची संख्या वाढते आहे. परंतु त्या दृष्टीने आवश्यक नियोजन नसल्यामुळे झोपडपट्टी व अनधिकृत बांधकामांची समस्या निर्माण होते. त्यामुळे या दिशेने योग्य प्रयत्न करणे आवश्यक आहे. शहरांच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करावा लागेल, असे ते म्हणाले. आॅरेंज सिटी वॉटर (ओसीडब्ल्यू) च्या सहकार्याने ही ‘महाचर्चा’ आयोजित करण्यात आली. यावेळी खा.विकास महात्मे, प्रवीण दटके, अरुण लखानी यांनीदेखील मत मांडले. कार्यक्रमाचे संचालन सहायक संपादक गजानन जानभोर यांनी केले. (प्रतिनिधी)