विहिरी कोरड्याठाक; बागांनी माना टाकल्या
By Admin | Published: April 25, 2016 04:40 AM2016-04-25T04:40:20+5:302016-04-25T04:40:20+5:30
साठवण तलावाच्या निर्मितीनंतर पुनर्वसित झालेल्या तुळजापूर तालुक्यातील सावंतवाडी नं. २ शिवारातील विहिरींनी तळ गाठला
संतोष मगर
तामलवाडी (उस्मानाबाद) -साठवण तलावाच्या निर्मितीनंतर पुनर्वसित झालेल्या तुळजापूर तालुक्यातील सावंतवाडी नं. २ शिवारातील विहिरींनी तळ गाठला असून, गावात रोजगार मिळत नसल्याने चार महिन्यांत काही कुटुंबानी शहर गाठले आहे. पाण्याअभावी जनावरे, माणसांचे हाल सुरू असून, काही फळबागांनी माना टाकल्याचेही चित्र आहे.
तुळजापूर तालुक्यातील काटी-शेळगाव रस्त्यावरील सावंतवाडीत शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. अनेक शेतकरी भाजी-पाल्याचे उत्पादन करून पुणे बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवितात. मात्र, दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. शिवारात जेमतेम ७ विहिरी, आणि दहा-बारा बोअर असल्या तरी हे स्रोतदेखील कोरडेठाक पडले आहेत.