टोमॅटो गेला शंभरीपार

By admin | Published: July 11, 2017 02:32 AM2017-07-11T02:32:35+5:302017-07-11T02:32:35+5:30

शहरातील अनेक मोठ्या बाजारांमध्ये टोमॅटोच्या दराने शंभरी पार केली असल्याचे पाहायला मिळत आहे.

Went to the tomb | टोमॅटो गेला शंभरीपार

टोमॅटो गेला शंभरीपार

Next


अक्षय चोरगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घाऊक बाजारांमध्ये टोमॅटो ५० ते ६० रुपये किलोच्या दराने विकला जात असतानाच शहरातील अनेक मोठ्या बाजारांमध्ये टोमॅटोच्या दराने शंभरी पार केली असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन-तीन आठवड्यांपूर्वी टोमॅटो २० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. परंतु टोमॅटोच्या किमतीने शंभरी पार केल्याने गृहिणींसमोर नवा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक गृहिणींनी गेल्या दोन आठवड्यांत गरज असूनही कमी टोमॅटो खरेदी केला आहे. तर अनेक गृहिणींनी टोमॅटो खरेदी केलेच नाहीत. दरम्यान, किरकोळ व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूट सुरू असून, वाढत्या महागाईत आता टॉमेटोचे वाढते दर ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी येथे गेल्या आठवड्याभरापासून टोमॅटो भरून येणाऱ्या वाहनांची संंख्या कमी झाली आहे. त्यामुळे शहरात टोमॅटोचा पुरवठा कमी झाला असल्याचे वाशी येथील एपीएमसी मार्केटमधील घाऊक व्यापाऱ्यांनी सांगितले. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून येणारा माल गेल्या काही दिवसांपासून एपीएमसी मार्केटमध्ये आलेला नाही. जो माल सध्या विकला जात आहे, तो माल कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून येत आहे. याउलट राज्यातील टोमॅटो दिल्लीकडे निर्यात केला जात असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती येथून ६० रुपये किमतीने टोमॅटोची खरेदी केली जाते. परंतु या मालामध्ये काही टोमॅटो निकृष्ट दर्जाचे निघतात. टोमॅटोचे वजन आम्ही तोलून मापून करत नाही. वजनापेक्षा थोडे जास्तच द्यावे लागते. वाहतुकीचा खर्च आहे. जागा भाडे आणि इतर खर्च असतोच. त्यामुळे टोमॅटो आणि इतर भाज्या जास्त किमतीने विकल्या जातात, असे चेंबूर येथील किरकोळ व्यापारी अप्पासे गावडे यांनी सांगितले.
एपीएमसीमध्ये दररोज जवळपास ५५० ते ६०० वाहनांमधून भाजीपाला विक्रीसाठी येत असतो. त्यापैकी ६० ते ७० वाहने टोमॅटोची असतात. गेल्या काही दिवसांपासून या वाहनांची संख्या अर्ध्याहून कमी झाली आहे. मुंबई आणि नवी मुंबईकरांना दररोज ७०० ते ८०० टन टोमॅटोची गरज असते; परंतु सद्य:स्थितीमध्ये जेमतेम ३०० ते ३५० टन टोमॅटोची आवक होत आहे. परिणामी, टोमॅटोच्या किमती वाढल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.एपीएमसी मार्केटमध्ये सोमवारी टोमॅटो ४५ ते ६० रुपये किलोने विकला जात होता. घाऊक बाजारांमध्ये टोमॅटो ज्या किमतीने विकला जातो; त्यापेक्षा दुप्पट भावाने किरकोळ बाजारांमध्ये विकला जातो. शहरात त्यामुळेच टोमॅटोच्या किमतीने शंभरी गाठल्याचे घाऊक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५० रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो ट्रान्सपोर्ट आणि इतर खर्च जोडून ६० ते ७० रुपये किलोने विकला पाहिजे. परंतु किरकोळ विक्रेते भाववाढीचा गैरफायदा घेऊन टोमॅटो १०० ते १२० रुपये किलोने विकत आहेत. किरकोळ विके्रत्यांवर शासनाने बंधने लादण्याची गरज आहे; तसे झाले नाही तर टोमॅटो आणि इतर भाज्यांचे भाव वाढतच राहतील.
गेल्या काही दिवसांपाासून टोमॅटोची ५० टक्के आवक कमी झाली आहे. देशात टोमॅटोचे उत्पादन कमी होणे हेच त्यामागचे प्रमुख कारण आहे. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांमधून येणारा माल खूपच कमी झाला आहे. महिन्याभरापूर्वी दररोज ८०० ते ९०० टन टोमॅटो एपीएमसीत येत होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून ही आवक ३०० टन झाली आहे. शेतकरी संप आणि अनियमीत पाऊस यामुळे टोमॅटोचे भाव स्थिर होण्यासाठी एक महिना लागेल.
- शंकर पिंगळे, घाऊक व्यापारी,
माजी संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती.
>टोमॅटोचे घाऊक बाजारांतील दर (प्रति किलो)
१ जून६ ते १४ रुपये
१ जुलै३० ते ४५ रुपये
२ जुलै३० ते ४८ रुपये
३ जुलै३४ ते ४० रुपये
४ जुलै३५ ते ४० रुपये
५ जुलै४० ते ४५ रुपये
६ जुलै४० ते ४५ रुपये
७ जुलै४५ ते ५० रुपये
८ जुलै४५ ते ५० रुपये
९ जुलै५० जे ६० रुपये
१० जुलै४५ ते ५५ रुपये
किरकोळ बाजारांतील टोमॅटोचे दर
कुर्ला१०० ते १२० रुपये
दादर१०० रुपये
मानखुर्द१२० ते १४० रुपये
वरळी१०० ते १२० रुपये
मशीद ८० ते १०० रुपये
बोरीवली१२० रुपये

Web Title: Went to the tomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.