...तर पश्चिम महाराष्ट्राला पेट्रोलची गरज नाही

By admin | Published: May 29, 2015 10:45 PM2015-05-29T22:45:35+5:302015-05-30T00:35:04+5:30

नितीन गडकरी : सांगली-कोल्हापुरातून दहा जिल्ह्यांना इथेनॉलचा पुरवठा शक्य

... West Maharashtra does not need petrol | ...तर पश्चिम महाराष्ट्राला पेट्रोलची गरज नाही

...तर पश्चिम महाराष्ट्राला पेट्रोलची गरज नाही

Next

सांगली : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक इथेनॉलची निर्मिती होऊ शकते. त्याचा उपयोग केल्यास पश्चिम महाराष्ट्रातील वाहने इथेनॉलवर धावू लागतील व पेट्रोलची गरजच भासणार नाही. केंद्र सरकारतर्फे यासंदर्भातील धोरणे तयार करण्यात येत असून, लवकरच त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिली.
येथील वालचंद अभियांत्रिकी स्वायत्त महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे अध्यक्ष अजित गुलाबचंद, शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु ए. एस. भोईटे,
प्राचार्य जी. व्ही. परिशवाड, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
गडकरी म्हणाले की, आपल्याकडे ऊस उत्पादनाची अधिक क्षमता आहे. बहुतांश शेतकरी उसाची लागवड करतो. साहजिकच प्रतिवर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होतो. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून तयार होणाऱ्या इथेनॉलचा पुरवठा पश्चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना, तसेच कर्नाटकातील चार जिल्ह्यांना करणे सहज शक्य आहे. वाहनांमध्ये इथेनॉलचा वापर केल्यास पेट्रोलची गरजच संपणार आहे. आर्थिक बचतही होणार आहे. राज्य सरकारने याबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे. इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देऊन निदान प्राथमिक टप्प्यात एस.टी. आणि रिक्षा तरी इथेनॉलवर धावू लागतील, यादृष्टीने ठोस पावले टाकणे अपेक्षित आहे.
केंद्र सरकार इथेनॉलच्या मुद्द्यावर गंभीर असून यासंदर्भातील धोरणे तयार करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे देशात पर्यावरणपूरक ‘ई आॅटो रिक्षा प्रकल्प’ राबविण्यात येणार आहे. सरकारच्या माध्यमातून नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.
ते म्हणाले की, विविध विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पर्यावरणहिताचे संशोधन करण्यावर भर दिला पाहिजे. उच्च शिक्षण
घेतले की, ती व्यक्ती सर्वज्ञानी झाली, असे कोणाला वाटत असेल, तर तो समज चुकीचा आहे. महाराष्ट्राला संतांची गौरवशाली परंपरा लाभली आहे. संतांच्या चरित्राचा अभ्यास केल्यास, त्यातील कोणीच शिक्षित नव्हते. परंतु त्यांनी जे विचार समाजाला दिले, ते फार मोलाचे आहेत.
खासदार संजय पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. शिवाजीराव नाईक, आ. विलासराव जगताप, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

पैसे कमावले पाहिजेतच पण...
युवकांनी उच्चशिक्षण घेऊन भरपूर पैसे कमविले पाहिजेत, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. त्याचबरोबर मूल्याधिष्ठीत जीवनपध्दतीस प्राधान्य देणाऱ्या भारतीय संस्कृतीचा विसर पडू न देता वाटचाल करावी. देशातील महाविद्यालयांत निवडणुकांच्या माध्यमातून राजकारणाचा शिरकाव झाला असला तरीही, विद्यार्थ्यांनी त्याकडे जास्त लक्ष न देता संशोधनावरच लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही गडकरी यांनी केले.

Web Title: ... West Maharashtra does not need petrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.