पश्चिम वाहिन्यांचे पाणी मराठवाडा, खान्देशात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 01:38 AM2017-07-20T01:38:38+5:302017-07-20T01:38:38+5:30
पश्चिम भागातील नद्यांचे गुजरातमार्गे समुद्रात वाया जाणारे पाणी अडवून त्याचा पूर्वभागासाठी उपयोग करून घेण्यासाठी पश्चिम वाहिन्यांचे पाणी वळविण्यास
- लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पश्चिम भागातील नद्यांचे गुजरातमार्गे समुद्रात वाया जाणारे पाणी अडवून त्याचा पूर्वभागासाठी उपयोग करून घेण्यासाठी पश्चिम वाहिन्यांचे पाणी वळविण्यास केंद्र सरकार सकारात्मक असून, त्यासाठी निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. दोन महिन्यांत त्याबाबत चांगला निर्णय घेणार असल्याची माहिती जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री उमा भारती यांचीही भेट घेणार असून, वेळ पडल्यास पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून मोठी घोषणा होण्याचे सूतोवाचही महाजन यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार जिवा पांडू गावित यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर महाजन म्हणाले, आठवड्यापासून जलसंपदा खात्याची यंत्रणा त्याचा अभ्यास करीत असून, महाराष्ट्राचे हक्काचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे. ते विशेषत: पूर्वभागाला मिळाल्यास गोदावरी व तापी खोऱ्याचा भाग सुजलाम् सुफलाम् होण्यास मदत होणार आहे.
पाणी वळविणार
मालेगाव, नाशिक, मराठवाडा, जळगाव या भागातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटेल, ही बाब राज्य सरकारलाही तत्त्वत: पटली आहे. त्याबाबत मंगळवारी रात्री एक वाजेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक घेण्यात आली. पश्चिम वाहिन्यांचे पाणी अडविण्याचे निश्चित झाले असून, त्यावर कामही सुरू झाले आहे. अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष साइटवर भेटी दिल्या जात आहेत.
- गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री