आदित्य ठाकरेंच्या सरसकट कर्ज माफीच्या मागणीचं काय ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:30 PM2019-09-17T12:30:33+5:302019-09-17T12:39:49+5:30
सरसकट कर्जमाफी व्हावी ही शिवसेनेची शेवटपर्यंत मागणी असणार असल्याचे म्हणणाऱ्या आदित्यांच्या भूमिकेचं काय झालं असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली असली तरीही, युती होणार असल्याचे निश्चीत समजले जात आहे. मात्र आचारसंहिता लागायला काही तासांचा अवधी राहिला असताना सुद्धा युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलेली सरसकट कर्ज माफीची मागणी अजूनही पूर्ण होऊ शकली नाही.
विधानसभा निवडणुकीत युती कायम राहणार असल्याचे विधान काही दिवसांपूर्वी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यांनतर आता सोमवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी 'प्राण जाये पर वचन ना जाये' असं सांगत युती करताना शिवसेनेकडून कोणताही दगाफटका किंवा विश्वासघात होणार नाही' असं स्पष्ट वक्तव्य केले. त्यामुळे युती होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
मात्र असे असले तरीही आपल्या प्रत्येक सभेत सरसकट कर्जमाफी व्हावी ही शिवसेनेची शेवटपर्यंत मागणी असणार असल्याचे म्हणणाऱ्या आदित्यांच्या भूमिकेचं काय झालं असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे, तसेच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही अशी भूमिका जनआशीर्वाद यात्रेत आदित्य ठाकरे यांनी घेतली होती.
मात्र आता कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होऊ शकतात, असे असताना सरसकट कर्ज माफीच्या कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. त्यामुळे युतीचं ठरलं पण आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या सरसकट कर्ज माफीच्या आश्वासनाच काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर निवडणुकीच्या काळात याच मुद्यावरून विरोधक भाजप-शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे आचारसंहिता लागण्यास काही तासांचा काळ उरला असून, सरकार यावर काही निर्णय घेणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.