भावासाठी काय पण! मोठ्या भावाने दिली धाकट्या भावाची परीक्षा, पोलिसांनी घातल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 03:44 AM2017-11-15T03:44:23+5:302017-11-15T03:44:46+5:30
भावासाठी काय पण... म्हणत नागपाडामध्ये मोठ्या भावाने धाकट्या भावाची परीक्षा दिल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला.
मुंबई : भावासाठी काय पण... म्हणत नागपाडामध्ये मोठ्या भावाने धाकट्या भावाची परीक्षा दिल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. ही बाब शाळेतील परीक्षकाच्या निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांना कळविले आणि मोठ्या भावाला पोलिसांच्या ताब्यात दिले. नागपाडा पोलिसांनी त्याला अटक केली असून, धाकट्या भावाचा शोध सुरू आहे.
नागपाडा परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत राम आणि श्याम (नावात बदल) कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांचे वडील व्यावसायिक आहेत. राम अभ्यासात हुशार आहे. मात्र श्यामला अभ्यासाचा प्रचंड कंटाळा आहे. रामने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले, तर श्याम हा नागपाडा येथील नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या दुसºया वर्षाचे शिक्षण घेत आहे. महाविद्यालयात परीक्षा सुरू होती. एक पेपर अवघड जात असल्याने श्यामने भावालाच परीक्षा देण्यासाठी आग्रह धरला. धाकटा भाऊ नापास होऊ नये म्हणून रामने श्यामच्या हॉल तिकिटावर स्वत:चा फोटो चिकटवून थेट परीक्षा केंद्र गाठले.
सोमवारी दुपारी साडे नऊ ते साडे अकरादरम्यान परीक्षा होती. त्यादरम्यान तेथील परीक्षकाला रामवर संशय आला. तो ओळखीचा विद्यार्थी वाटत नसल्याने त्यांनी त्याची अधिक चौकशी केली. तेव्हा तो भावाच्या जागेवर परीक्षा देत असल्याचे समोर आले. या प्रकरणी महाविद्यालयाच्या वतीने नागपाडा पोलिसांत तक्रार करण्यात आली. नागपाडा पोलिसांनी दोघांविरुद्धही बनावट दस्तावेज बनवून परीक्षा दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मोठ्या भावाला अटक करण्यात आली असून, धाकटा भाऊ फरार आहे.