क्रिकेटसाठी काय पण...!
By admin | Published: November 7, 2014 12:30 AM2014-11-07T00:30:06+5:302014-11-07T00:49:26+5:30
त्यागाचे केले चीज : साईल शिबेची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड
प्रदीप शिंदे - कोल्हापूर --शाळेत शिक्षकांनी तुम्ही कोण होणार? या विचारलेल्या प्रश्नावर डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सी.ए. अशी उत्तरे आली. ‘मी मात्र क्रिकेटर होणार’ हे सांगताच वर्गातील सगळे जोरात हसले. ही गोष्ट वडिलांना सांगताच त्यांनी माझ्या स्वप्नाला बळ देण्यासाठी मला घेऊन कोल्हापुरातच संसार थाटला. वडिलांनी केलेल्या त्यागाच्या प्रत्येक क्षणाची आठवण ठेवल्याने मी यशस्वी होत गेलो, अशी बोलकी प्रतिक्रिया साईल विकास शिबेने दिली. साईल शिबेची नुकतीच शासकीय १९ वर्षांखालील शासकीय महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाली आहे.
साईल शिबे हा मूळचा कुवे (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील. आई-वडील, आजी-आजोबा आणि लहान बहीण असा त्याचा परिवार. मध्यमवर्गीय कुटुंबातील साईलचे वडील प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करतात. लहानपणापासूनच त्याला क्रिकेटची आवड होती. वडिलांचीही तो चांगला क्रिकेटर व्हावा, अशी इच्छा होती. मात्र, गावी क्रिकेटसाठी पोषक वातावरण नसल्याने व मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी साईलच्या वडिलांनी गाव सोडून कोल्हापूर येथे यायचे ठरविले. स्वत:चा व्यवसाय बाजूला ठेवून त्यांनी मुलाच्या क्रिकेटच्या करिअरला महत्त्व दिले.
कोल्हापुरात आल्यानंतर साईलला शाहूपुरी जिमखान्यावर प्रशिक्षणासाठी दाखल केले. अल्पावधीच जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली.
माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडिलांची सुरू असलेली धडपड पाहून नेहमी प्रेरणा मिळते. यशात आनंदी होण्याची आणि खचलेल्या मनाला उभारी बाबांमुळेच मला प्रत्येक निर्णायक क्षणी मिळाली. अभ्यासाव्यतिरिक्त खिलाडू वृत्तीचे धडेसुद्धा बाबांकडूनच मिळाले. - साईल शिबे
जोपर्यंत साईलचा क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे, तोपर्यंत त्याला मी खेळण्यासाठी सर्वतोपरी मदत करणारच. यासाठी मला कोणतीही किंमत मोजावी लागली तरी मी ती देण्यासाठी तयार आहे. मी माझ्या मुलांसाठी जे कष्ट घेत आहे, त्या कष्टांचे तो चीज करीत आहे, याचा मला मनापासून आनंद वाटतो. -विकास शिबे.
साईलचा चढता आलेख
मॅन आॅफ द मॅच व बेस्ट बॉलर पुरस्कार, ग्लोबल (केडीसीए) चषक २००९
मॅन आॅफ द मॅच व बेस्ट बॉलर पुरस्कार, करवीर चषक २०१०
बेस्ट स्कोअरर ग्लोबल (केडीसीए) चषक २०१०
बेस्ट बॅटस्मन एक्सलंट प्लेअर (केडीसीए) ग्लोबल चषक २०११
मॅन आॅफ द सीरिज व बेस्ट बॅटस्मन (१५ वर्षांखालील केएसए) २०११
मॅन आॅफ द सीरिज सहारा क्रिकेट अकॅडमी, इचलकरंजी आयोजित २०१२
बेस्ट स्कोअरर भोपेराव कदम चषक (केडीसीए) आयोजित २०१२
बेस्ट बॅटस्मन तात्यासाहेब सरनोबत चषक (केएसए) - २०१२
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एम.सी.ए)च्या १६ वर्षांखालील संघात निवड २०१२-१३