Maharashtra BJP: आता महाराष्ट्रात काय? 10 तारखेनंतर काय होते हे पाहाच, भाजपाने दिलेले इशारे

By अतुल कुलकर्णी | Published: March 11, 2022 07:06 AM2022-03-11T07:06:45+5:302022-03-11T07:08:50+5:30

भाजपला हवी स्वबळावर सत्ता; राज्यात केजरीवाल, ममता कोण होणार? दहा तारखेनंतर काय होते हे पाहाच, असे भाजपचे राज्यातील नेते सतत बोलत होते. त्या बोलण्याचे अर्थ आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना कळत असतील. 

What about Maharashtra now? Look at what happens after 10th, the warnings given by BJP | Maharashtra BJP: आता महाराष्ट्रात काय? 10 तारखेनंतर काय होते हे पाहाच, भाजपाने दिलेले इशारे

Maharashtra BJP: आता महाराष्ट्रात काय? 10 तारखेनंतर काय होते हे पाहाच, भाजपाने दिलेले इशारे

googlenewsNext

- अतुल कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पाचपैकी चार राज्यांत भाजपने यश मिळविल्यानंतर 'आता महाराष्ट्राचा नंबर' अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्यात भाजप कशारीतीने सत्ता मिळविणार हाच एकमेव ‘मिलीयन डॉलर’ प्रश्न सगळ्यांपुढे आहे. 

या निकालाने भाजपचा आत्मविश्वास वाढला असला तरी महाराष्ट्रात ते लगेचच कोणासोबत तरी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करतील अशी कोणतीही शक्यता नाही. त्या उलट काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांना कसे जास्तीत जास्त अडचणीत आणता येईल आणि या तिघांचीही स्पेस स्वत:च्या पक्षवाढीसाठी कशी वापरता येईल, याचे डावपेच राज्यातील भाजप नेत्यांनी सुरू केले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जिद्दीने पंजाबसारख्या दुसऱ्या राज्यात जाऊन घवघवीत यश मिळविले. गोव्यासारख्या राज्यात स्वत:चे खाते उघडले. मात्र, 
देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असणारे महाराष्ट्रातले नेते महाराष्ट्रातच भाजपला पराभूत का करू शकत नाहीत, असा प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांना पडला आहे.
दहा तारखेनंतर काय होते हे पाहाच, असे भाजपचे राज्यातील नेते सतत बोलत होते. त्या बोलण्याचे अर्थ आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना कळत असतील. 

आत्मपरीक्षण करण्याची हीच वेळ
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी एकट्याने भाजपशी लढल्या आणि दणदणीत विजय मिळवून दाखवला. बिहारमध्ये लालू प्रसाद यांचा मुलगा तेजस्वीने एकट्याने ७५ च्या आसपास जागा मिळवल्या. 
उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांनी एकट्याने झुंज देत १२६ जागांचा पल्ल्ला गाठला. या सगळ्या ठिकाणी भाजपची निवडणूक यंत्रणा कमालीची वेगळी होती. 
झाडून सगळे नेते मैदानात उतरले होते. अशावेळी जर हे लोक एवढे यश मिळवू शकतात, तर महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र असतानाही असे यश का मिळवू शकत नाही याचे आत्मपरीक्षण करण्याची हीच वेळ आहे.

अशी कोणतीही शक्यता नाही
भाजपच्या आजच्या यशाने राज्यातील सत्तेतल्या तिन्ही पक्षांना एकत्र येण्यासाठी मजबूर केले आहे. तीन पक्षांतील कोणताही एक पक्ष भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत जाणार नाही. मात्र, गेल्या दोन वर्षांत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी एकदाही टोकाचे विधान न करणे, फडणवीस यांनीही या दोघांविरुद्ध फार न बोलणे, त्यातून काही नवे घडू शकते असा तर्क दिला जात आहे. अजित पवार यांच्यासोबत फसलेल्या प्रयोगाची पुनरावृत्ती होऊ शकते किंवा एकनाथ शिंदे वेगळा गट करून भाजपसोबत जातील का? अशीही चर्चा असली तरी लगेच राज्यात काही बदल होतील अशी कोणतीही शक्यता आजतरी नाही.

Web Title: What about Maharashtra now? Look at what happens after 10th, the warnings given by BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.