रुडयार्ड किपलिंगचा डीन बंगल्याशी तरी काय संबंध?

By admin | Published: September 25, 2015 03:28 AM2015-09-25T03:28:00+5:302015-09-25T03:28:00+5:30

नोबेल विजेता लेखक रुडयार्ड किपलिंगचा जन्म जे.जे. स्कूल आॅफ आर्टच्या डीन बंगल्यात झाला असे सांगून तेथे त्याचे स्मारक करण्याचा घाट घातला जात आहे

What about Rudyard Kipling's Dean Bengalis? | रुडयार्ड किपलिंगचा डीन बंगल्याशी तरी काय संबंध?

रुडयार्ड किपलिंगचा डीन बंगल्याशी तरी काय संबंध?

Next

ओंकार करंबेळकर, मुंबई
नोबेल विजेता लेखक रुडयार्ड किपलिंगचा जन्म जे.जे. स्कूल आॅफ आर्टच्या डीन बंगल्यात झाला असे सांगून तेथे त्याचे स्मारक करण्याचा घाट घातला जात आहे. मात्र त्याच्या जन्मानंतर १७ वर्षांनी १८८२ साली या बंगल्याची उभारणी झाली आहे. तेव्हा त्याचा आताच्या डीन बंगल्याशी किती संबंध आहे हे तपासायला हवे.
जे.जे. स्कूल आॅफ आर्टच्या कॅम्पसमधील या देखण्या बंगल्याशी किपलिंगचे नाव जोडले जाते. त्याचा जन्म याच कॅम्पसमध्ये झाला याबाबतही माहिती मिळते. १८६५ हे रुडयार्ड किपलिंगचे जन्मवर्ष आहे. त्यामुळे १८८२मध्ये बांधलेल्या बंगल्यामध्ये त्याचा जन्म होणे अशक्य गोष्ट आहे. १८५७ साली एलफिन्स्टन इन्स्टिट्यूट येथे जे.जे. स्कूल आॅफ आर्टची स्थापना झाली. १८६५च्या सुमारास ते आताच्या कॅम्पसमध्ये आणण्यास सुरुवात झाली. रुडयार्ड किपलिंगचे वडील जॉन लॉकवूड किपलिंग हे प्रख्यात शिल्पकार म्हणून नावाजलेले होते आणि ते जे.जे. स्कूलमध्ये अध्यापन करीत असत. त्यामुळे जे.जे.च्या आवारातील इमारती बांधत असताना रुडयार्डचा जन्म झाला हे निश्चित. अनेक संकेतस्थळांवर डीन बंगला आज ज्या स्थळी उभा आहे, त्याच स्थळी एका कॉटेजमध्ये त्याचा जन्म झाला अशी माहिती वाचायला मिळते. मात्र त्यासाठी कोणताही पुरावा सादर केला जात नाही. रुडयार्डची आई अ‍ॅलिस किपलिंग ही ब्रिटनमधील अत्यंत प्रसिद्ध मॅकडोनल्ड भगिनींपैकी एक होती. त्यामुळे अ‍ॅलिस आणि जॉन लॉकवूड या दाम्पत्याचे मूल साध्या कॉटेजमध्ये जन्म घेण्याऐवजी तत्कालीन एखाद्या ब्रिटिश रुग्णालयात जन्मास येण्याची शक्यताही बोलून दाखविली जाते. म्हणूनच किपलिंगचे खरे जन्मस्थळ शोधण्यासाठी त्या वेळेस उपलब्ध असणाऱ्या रुग्णालयांतील माहितीची तपासणी होण्याची गरज आहे.
रुडयार्डच्या वडिलांची १८७५ साली लाहोरच्या मेयो स्कूल आॅफ आर्टच्या प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच त्याआधी चार वर्षांपूर्वी रुडयार्डला शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविण्यात आले होते. त्यानंतरच्या काळामध्ये या बंगल्याची बांधणी झाली असल्यामुळे डीन बंगल्याचे किपलिंग बंगल्यात रूपांतर करण्याचा हट्ट इतिहासापेक्षा विसंगत वाटतो.

रुडयार्ड किपलिंगबद्दल...
रुडयार्ड किपलिंग हा लेखक म्हणून ‘जंगल बुक’मुळे भारतीय आणि जगभरातील लोकांना विशेष ओळखीचा आहे. त्याच्या कविताही तितक्याच गाजल्या. व्हिक्टोरियन काळातील एक लेखक म्हणून त्याचे नाव गाजले. त्याच्या कवितांच्या प्रेमात ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचरही होत्या. मात्र वसाहतवादी आणि साम्राज्यवादाचा त्याने लेखनातून ठामपणे पुरस्कार केल्याने भारतात आजही त्याच्याबद्दल नकारात्मक भावना आहेत. १९०७ साली त्याचा ‘नोबेल’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरव करण्यात आला.

प्रल्हाद धोंड यांची माहिती
रुडयार्ड किपलिंगच्या जन्मशताब्दीच्या काळात प्रख्यात चित्रकार प्रल्हाद अनंत धोंड जे.जे. स्कूल आॅफ आर्टचे डीन होते आणि ते या डीन बंगल्यातच वास्तव्यास होते. किपलिंगचा जन्म या बंगल्यात झालाच नाही. केवळ त्याचे नाव जोडल्यामुळे बंगला व त्याच्या आसपासची झाडे सुरक्षित राहतील, असा विचार करून धोंड आणि त्यांच्या सहकारी अध्यापकांनी त्याच्या जन्मस्थळासंदर्भातील विसंगती मांडायची नाही असे निश्चित केले. हे सर्व स्पष्ट शब्दांमध्ये त्यांनी त्याचे आत्मचरित्र ‘रापण’मध्ये लिहून ठेवले आहे. त्यांच्या या लेखनाला आक्षेप घेऊन रुडयार्डचा जन्म तेथेच झाला होता अशी मांडणी आजवर कोणीही केलेली नाही.

Web Title: What about Rudyard Kipling's Dean Bengalis?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.