आम्ही बोलून काय होणार बाबा ?

By Admin | Published: September 26, 2015 12:01 AM2015-09-26T00:01:56+5:302015-09-26T00:22:40+5:30

रुद्रच्या आईचा प्रश्न : संपर्कच नसल्याचे स्पष्टिकरण

What are we going to talk about? | आम्ही बोलून काय होणार बाबा ?

आम्ही बोलून काय होणार बाबा ?

googlenewsNext

जत : रुद्रगोंडा आमच्याजवळ नाही. २००९ पासून त्याचा आणि आमचा संपर्कच नाही. त्यामुळे आम्ही त्याच्या वकीलपत्राबाबत बोलून काय उपयोग होणार बाबा?... असा सवाल केला रुद्रगोंडाची आई रत्नाक्का यांनी. थेट काराजनगीत त्यांना गाठल्यानंतर त्यांनी कन्नडमध्येच ही प्रतिक्रिया व्यक्त केली.कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित फरारी रुद्रगोंडा रेवगोंडा पाटील (वय ३२, रा. काराजनगी, ता. जत) याने न्यायालयात हजर व्हावे, त्याच्या मागे वकिलांची फौज उभी करू, असे ज्येष्ठ वकील व हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव पुनाळेकर यांनी कोल्हापूर येथे बोलताना म्हटले आहे. यासंदर्भात रत्नाक्का यांच्याशी प्रत्यक्ष काराजनगी येथे जाऊन संपर्क साधला असता त्या बोलत होत्या. एखाद-दुसरा मराठी शब्द वापरत त्यांनी कन्नडमध्येच प्रतिक्रिया दिली.गोविंद पानसरे हत्या प्रकरणात रुद्रगोंडा याचा हात आहे, म्हणून पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात तुम्हाला काय माहिती आहे काय? असे त्यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, तो सांगली येथे शिक्षणासाठी गेला होता, एवढेच मला माहीत आहे. गोविंद पानसरे कोण आहेत, ते मला माहीत नाही. सनातन म्हणजे काय आहे, रुद्रगोंडा सनातनचा साधक होता किंवा नाही याबद्दलही माहिती नाही. मोलमजुरी, पशुपालन, शेती व्यवसाय यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आम्ही कसबसे घर चालवत आहोत. आम्ही जर थांबून राहिलो, तर आमचा पोटा-पाण्याचा प्रश्न बिकट होतो. आम्ही कोणाच्याही मदतीची अपेक्षा ठेवली नाही.
रुद्रगोंडा याचे वडील रेवगोंडा आप्पासाहेब पाटील यांनी प्रसारमाध्यमांविषयी नाराजी व्यक्त केली. तुम्ही काय चालवले आहे, ते आम्हाला समजत नाही. आम्हाला आमचे दैनंदिन काम करू द्या. आमचे फोटो काढून तुम्ही काय करणार आहात, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यानंतर बैलजोडी घेऊन ते शेतात कामासाठी गेले.
दरम्यान, रुद्रगोंडा याचे चुतले व ‘सतातन’चे साधक इरगोंडा पाटील व इतर नागरिकांनी समस्त राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने जतच्या तहसीलदारांना निवेदन देऊन कॉ. पानसरे खून प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी, अशी मागणी केली.
यावेळी इरगोंडा पाटील म्हणाले की, मी कोठेही बेपत्ता अथवा गायब झालेलो नाही, मी जत शहरातच असून नियमित काम सुरू आहे. (वार्ताहर)


सनातनवाल्यांचे कोम्बिंग आॅपरेशन करा : आंबेडकर
सांगली : देशात अनेक हिंदू अतिरेकी संघटना उभ्या राहिल्या आहेत. या देशातील हिंदू असुरक्षित आहेत का, याचे उत्तर संघटनांनी द्यावे, असे आव्हान देत कायद्याच्या चौकटीबाहेर असणाऱ्या सर्वच संघटनांवर बंदी घातली पाहिजे, असे रोखठोक मत भारिप-बहुजन महासंघाचे नेते माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार बैठकीत व्यक्त केले. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी ‘सनातन’वाल्यांचा संबंध उघड केला आहे. पोलीस त्यांचे कोम्बिंग आॅपरेशन का करीत नाहीत, असा सवालही त्यांनी केला.


आंबेडकर म्हणाले की, देशातील हिंदू असुरक्षित असेल, तर अशा संघटनांचे कार्य समजू शकतो. पण पंतप्रधान, मुख्यमंत्री, लोकसभाध्यक्ष, मुख्य न्यायाधीश अशी कित्येक पदे अनेक वर्षांपासून हिंदूंकडेच आहेत. या हिंदूंमध्येच संघर्ष सुरू असल्याने अनेक संघटना तयार होत आहेत. हिंदंूविरोधात उठाव करणाऱ्यांना मारण्याचा त्यांचा उद्देश असेल, तर अशा संघटनांवर बंदी हाच एकमेव मार्ग आहे. ट्रेड युनियन, धर्मादाय संस्था, निवडणूक आयोग, कंपनी अ‍ॅक्टखाली नोंदविल्या जाणाऱ्या संघटनाच कायदेशीर आहेत. याबाहेरील सर्वच संघटनांना बंदी घातली पाहिजे.
कॉ. पानसरे व त्यांच्या मारेकऱ्यांचे व्यक्तिगत भांडण नव्हते. पानसरे एका विचाराचे प्रतिनिधीत्व करीत होते. तो विचार सनातन्यांना चालत नाही. जे आपल्या विचाराचे नाहीत, त्यांना संपविण्याचा आदेश या संघटनांनी काही वर्षांपूर्वीच दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी केवळ समीर गायकवाडभोवतीच तपास मर्यादित न ठेवता आपल्या कक्षा वाढविल्या पाहिजेत. पोलिसांनीच न्यायालयात गायकवाडचे संबंध कोणाशी आहेत, हे सांगितले आहे. महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक पोलिसांनी या तपासात जादा प्रगती केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी मर्यादित तपास केला तरी, कर्नाटक पोलीस थांबतील असे नाही. त्यासाठी राज्य पोलिसांनी आपल्या इभ्रतीसाठी राजकीय दबाव झुगारून सनातनवाल्यांचे कोम्बिंग आॅपरेशन करावे, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: What are we going to talk about?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.