हातावरचं पोट, आम्ही काय करायचं?
By admin | Published: November 10, 2016 02:14 AM2016-11-10T02:14:01+5:302016-11-10T02:14:01+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्यात आल्या आहेत
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्यात आल्या आहेत. बँका आणि एटीएमही बंद ठेवण्यात आल्याने गरीब, गरजूंना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. दत्तवाडी, पर्वती, जय भवानीनगर अशा परिसरातील वस्ती भागातील महिलांनी ‘हातावरचं पोट, एक दिवसाचा खर्च तरी कसा भागवायचा’ असा प्रश्न उपस्थित केला. त्याचवेळी, दोन दिवसांनी बँकांमधून नोटा बदलून मिळणार असल्याची माहिती झोपडपट्टी भागातील बहुतांश लोकांना नसल्याचे या वेळी दिसून आले.
दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीला पूजलेले. वेठबिगारी करून त्यांना रोजचा उदरनिर्वाह करावा लागतो. कधी आठवड्याचा, तर कधी दिवसाचा पगार मिळतो; जसा पगार मिळतो त्याप्रमाणे तेल, तांदूळ, पीठ असे जिन्नस खरेदी केले जातात.
नोटा चलनातून रद्द करण्यामागचे कारण, त्याचे फायदे-तोटे याबाबत त्यांना काहीच माहिती नाही.
आजचा दिवस कसा निभावून न्यायचा; एवढेच त्यांना माहीत असते. नोटा चलनातून हद्दपार होण्याबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडून मिळालेली उत्तरे विचार करायला लावणारी आहेत.