अनौरस मूल अनुकंपा नोकरीस पात्र?
By admin | Published: January 16, 2015 06:01 AM2015-01-16T06:01:33+5:302015-01-16T06:01:33+5:30
सरकारी कर्मचा-याचे सेवेत असताना निधन झाल्यावर त्याच्या अनौरस मुलास अनुकंपा तत्त्वावर नोकरी देता येते का
मुंबई : सरकारी कर्मचा-याचे सेवेत असताना निधन झाल्यावर त्याच्या अनौरस मुलास अनुकंपा तत्त्वावर नोकरी देता येते का, हा कायद्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे फेरविचारासाठी परत पाठविला आहे.
अमरावती महापालिकेतील एक लिपिक उकरडा पुंडलिकराव अठोर (आठवले) यांचे १८ जून १९९७ रोजी निधन झाल्यावर महापालिकेने त्यांचा अनौरस मुलगा सागर यास सप्टेंबर २०१२मध्ये अनुकंपा नोकरी दिली. सागरची विवाहित सावत्र बहीण विजया उकरडा अठोर (आठवले) हिने त्याविरुद्ध केलेली याचिका व फेरविचार अर्ज नागपूर खंडपीठाने गेल्या वर्षी मार्च व नोव्हेंबरमध्ये फेटाळले होते. त्याविरुद्ध विजयाने केलेले अपील मान्य करून सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. व्ही. गापाळ गौडा व न्या. आर. भानुमती यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील वादमुद्दा फेरविचारासाठी उच्च न्यायालयाकडे परत पाठविला.
दिवंगत उकरडा अठोर यांना शांताबाई व कुंताबाई अशा दोन पत्नी होत्या. त्यांना शांताबाईपासून विजया ही मुलगी तर कुंताबाईपासून सागर हा मुलगा झाला.
उकरडा यांचे निधन झाले तेव्हा विजया १७ वर्षांची होती व इयत्ता १०वीत शिकत होती. विजया सज्ञान झाल्यावर तिला वडिलांच्या जागी अनुकंपा नोकरी द्यावी, असे अर्ज शांताबाई यांनी वर्र्ष १९९७ व ९८मध्ये महापालिकेकडे केले होते. परंतु त्यावर बरीच वर्षे काहीच निर्णय झाला नाही. दरम्यान २००९मध्ये विजयाचे लग्न झाले. अनौरस मुलगा सागर याने अनुकंपा नोकरीसाठी मे २००९मध्ये अर्ज केला. त्यास विजयाने आक्षेप घेतला. तरी त्यास गेल्या वर्षी फेब्रुवारीत नोकरी दिली गेली.
उकरडा यांच्या निधनानंतर शांताबाई आणि विजया यांनी दिवाणी न्यायालयाकडून वारसा हक्काचा निवाडा घेतला. त्यानुसार उकरडा
यांचे संपूर्ण पेन्शन शांताबार्इंना मिळाले. त्यांच्या प्रॉव्हिडन्ट
फंडाचे पैसे शांताबाई, कुंताबाई, विजया व सागर यांना समसमान मिळाले होते. (विशेष प्रतिनिधी)