सनातनचा एवढा पुळका का?
By admin | Published: January 10, 2016 12:50 AM2016-01-10T00:50:16+5:302016-01-10T00:50:16+5:30
सनातन संस्थेचे वकील उघडपणे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना धमकी देतात. मात्र सरकारला त्याचे गांभीर्य नाही. सरकारला सनातनचा एवढा पुळका का, असा सवाल विधानसभेचे
संगमनेर (अहमदनगर) : सनातन संस्थेचे वकील उघडपणे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना धमकी देतात. मात्र सरकारला त्याचे गांभीर्य नाही. सरकारला सनातनचा एवढा पुळका का, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला आहे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. कॉ. गोविंद पानसरे यांच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला संरक्षण देण्याचे जाहीर पत्र देण्यात आले. तरीही सरकार सनातनबाबत गंभीर नाही. या संघटनेवर बंदी आणावी, अशी आमची मागणी कायम आहे. पण सनातनसाठी सुसंगत असेच सरकारचे धोरण असल्याची टीका त्यांनी केली.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीतून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. कर्जमाफीशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने सरकारने हा विषय अधिक प्रतिष्ठेचा न करता तातडीने कर्जमाफीचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
केंद्राचे निकष डावलून राज्य सरकारने स्वत:चे आदेश जारी केल्याने राज्यात २४ हजार गावे मदतीपासून वंचित राहणार असल्याचे विखे यांनी सांगितले. ठिबक सिंचन अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना व्याजासह देण्याची मागणी त्यांनी केली आहे.