आघाडी सरकारने काय केले, मी गाळ काढतोय

By admin | Published: May 30, 2017 03:57 AM2017-05-30T03:57:31+5:302017-05-30T03:57:38+5:30

गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने काय केले ते सांगावे, आम्ही अडीच वर्षात काय केले, ते सांगायला

What the coalition government has done, I am taking out the mud | आघाडी सरकारने काय केले, मी गाळ काढतोय

आघाडी सरकारने काय केले, मी गाळ काढतोय

Next

सांगली/कोल्हापूर/ सातारा : गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने काय केले ते सांगावे, आम्ही अडीच वर्षात काय केले, ते सांगायला तयार आहोत. त्यांनी एवढा गाळ केला आहे, की तो काढण्याचे काम मी करीत आहे. हाच गाळ शेतात गेला असता, तर खताची गरज न भासता शेतकऱ्यांनी तीन-तीन पिके घेतली असती, अशी तोफ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी इस्लामपूर येथे डागली.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत इस्लामपूर (जि.सांगली), मलकापूर (जि.सातारा) व गारगोटी (जि.कोल्हापूर) येथे शेतकरी मेळावे झाले. या तिन्ही मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.
इस्लामपूर येथील मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सध्या राज्यात शेतकऱ्यांचा कैवार घेऊन अनेकजण आंदोलन करत आहेत. आमच्यावर शेतकरीविरोधी असल्याची टीका करतात. मात्र, राज्यातील जनतेने महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये इतर पक्षांचा सुफडासाफ करुन भाजपवर विश्वास दाखवला आहे. विधानसभेपाठोपाठ भाजप राज्यातील सर्वांत जास्त लोकप्रतिनिधी असणारा पक्ष बनला आहे. गेल्या अडीच वर्षांच्या काळात शेतकऱ्यांच्या समस्या मिटल्या, असा आमचा दावा नाही. मात्र आम्ही प्रामाणिक आहोत. राज्यातील शेती क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक होत आहे. १९९५ च्या युती शासनाने पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा खोरेची कामे सुरु केली. त्यानंतरच्या १५ वर्षात ही कामे का पूर्ण झाली नाहीत, याचे उत्तर तत्कालीन राज्यकर्त्यांनी द्यावे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून राज्याला २६ हजार कोटी मिळाले आहेत.गेल्या दोन वर्षात उसाच्या एफआरपीची ९९ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या हातात दिली़

मला डिवचू नका: सदाभाऊ खोत
चळवळीत अनेक वादळे पाहिली. त्या वादळांशी दोन हात केले. मला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला, तर अंगावर घेतल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा कृषी राज्यरांत्री सदाभाऊ खोत यांनी दिला.
खासदार शेट्टी आणि त्यांच्यातील दरी रुंदावत चालल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच आत्मक्लेश यात्रेच्या सांगतेनंतर मोठा धक्का देऊ, मला लेचापेचाही समजू नका, असेही ते म्हणाले.

‘स्वाभिमानी’ने मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे !
कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी यांनी ‘आत्मक्लेश’ यात्रा काढली आहे. मात्र, अद्यापपर्यंत सरकारचा एकही प्रतिनिधी राजू शेट्टी यांना भेटायला गेलेला नाही, याचा निषेध करीत कऱ्हाडमध्ये कृष्णा हॉस्पिटलसमोर दुपारी दीड वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले.

कटाप्पा कोण
माहीत नाही!
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यावर थेट टीका केली . सांगली जिल्ह्यात कटाप्पा कोण आणि बाहुबली कोण, हे मला माहीत नाही. मात्र आज निशिकांत पाटील आणि वैभव शिंदे या दोन बाहुबलींनी भाजपत प्रवेश केला आहे. वैभव यांचा प्रवेश अनेकांना हादरा देऊन गेला आहे. ज्यांना हादरे बसले, त्यांची स्पंदने आमच्यापर्यंत येऊन पोहोचली आहेत.

Web Title: What the coalition government has done, I am taking out the mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.