राफेलची कागदपत्रे सांभाळता न येणारे देश काय सांभाळणार; शरद पवारांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 05:42 AM2019-03-14T05:42:33+5:302019-03-14T05:43:01+5:30
भ्रष्टाचार दडपण्याकरिता चोरीचा बनाव केल्याचा दावा
ठाणे : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार धड राफेल विमानाच्या खरेदीसंबंधीची कागदपत्रे सांभाळू शकत नाही, तर देशाचे संरक्षण काय करणार, असा टोला राष्टÑवादी काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधानांना लगावला. राफेलची किंमत वाढली असून जी रिलायन्स कंपनी ही विमाने बनवणार आहे, त्यांना जमीन दिली असतानाही ते अद्याप फॅक्टरी उभी करू शकलेले नाहीत. कर्मचारीवर्ग नियुक्त केलेला नाही. मशिनरी नाही. साधे कागदी विमानसुद्धा ते अद्याप बनवू शकले नसल्याची टीकाही त्यांनी केली.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपाचा खरपूस समाचार घेतला. राफेलमध्ये झालेला भ्रष्टाचार दडपण्यासाठी कागदपत्रांच्या चोरीचा बनाव केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. कागदपत्रे चोरीला गेली, मग पोलिसात तक्रार का केली नाही, असाही सवाल त्यांनी केला. बोफोर्स प्रकरणाची ज्या पद्धतीने चौकशी झाली, त्याचप्रमाणे राफेलचीसुद्धा चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
नोटाबंदी ही देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देणारी बाब ठरू शकते, असे मोदींना सांगितले असतानाही त्यांनी नोटाबंंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे बँकेच्या रांगेत नोटा बदलण्यासाठी उभ्या असलेल्या १०० जणांना आपले प्राण गमवावे लागले. प्रत्येक वर्षी नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन दिले होते. परंतु, यामुळे छोट्यामोठ्या १५ लाख लोकांचे व्यवसाय बंद पडले. बेकारी वाढली, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, याला जबाबदार भाजपा-शिवसेना युतीचेच सरकार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘ना मैं खाऊंगा, ना मैं खाने दूंगा’ असे मोदी सांगायचे. परंतु, त्यांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराचा आकडा पाहता, त्यांनी स्वत:च खाल्ले असून जनतेला मात्र उपाशी ठेवले.
निवडणुकीपूर्वी काळा पैसा बाहेर काढून तो देशातील गरीब जनतेच्या अकाउंटमध्ये जमा केला जाईल, या आश्वासनाचाही मोदींना विसर पडला आहे. बुलेट ट्रेन सुरू करण्याचे स्वप्न दाखवले जात आहे. परंतु, अद्याप जमिनी ताब्यात घेतलेल्या नाहीत. समृद्धी महामार्ग तयार केला जाईल, असे आश्वासनही दिले होते. परंतु, पावणेपाच वर्षांत जमिनी ताब्यात घेता आलेल्या नाहीत. राज्यात सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना-भाजपाने अनेक आश्वासने दिली होती. परंतु, ती अद्याप पूर्ण केलेली नसून केवळ राज्यातील जनतेची फसवणूक या सरकारने केली असल्याची टीका त्यांनी केली. शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे स्वप्न दाखवण्यात आले, मात्र ते उभे तर राहिले नाहीच, त्याचा खर्च मात्र वाढला. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक अद्याप उभारले गेले नाही. सत्तेवर आल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात धनगर समाजाला आरक्षण देण्याचा वायदा मुख्यमंत्र्यांनी केला होता. मराठा समाजाला आरक्षण जाहीर करून वसतिगृहांची निर्मिती केली जाईल, असे सांगितले होते. परंतु, एकही वसतिगृह उघडू शकलेले नाहीत. मुस्लिम समाजाला सवलती देण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. परंतु, राज्यात युतीचे सरकार आले आणि त्यांनी हा निर्णय बासनात गुंडाळल्याकडे लक्ष वेधले.
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला संपूर्ण ताकदीनिशी काम करायचे असून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचायचे आहे, असे पवार यांनी पदाधिकाऱ्यांना बजावले. व्होटिंग मशीनमध्ये काही बिघाड असला, तर त्यासाठी जागता पहारा ठेवला पाहिजे. बुथस्तरावरील प्रत्येक कार्यकर्त्यावर ४० ते ५० मतदारांची जबाबदारी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. ठाण्यातील मतदार हा जाणता आणि सुशिक्षित आहे. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
...तर गणेश नाईक यांनी लगेच अर्ज भरावा
गणेश नाईक यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी इच्छा यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. लागलीच शरद पवार आणि जयंत पाटील यांनी गणेश नाईक यांची तयारी असेल, तर आताच ठराव करावा आणि त्यांनी लगेच अर्ज भरावा, असे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये स्पष्ट केले. मात्र, त्यानंतर नाईक यांनी आपल्याला निवडणूक लढवण्यात रस नसल्याचे पत्रकारांकडे स्पष्ट केले. त्यामुळे आनंद परांजपे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे अप्रत्यक्ष संकेत प्राप्त झाले आहेत.