सरकार असूनही शिवसैनिकांना काय मिळालं?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 08:31 AM2022-07-15T08:31:25+5:302022-07-15T08:32:07+5:30
जे सोबत होते ते आपल्याला संपवायला निघाले. मी अनेकदा सांगितले काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा, हे घातक आहे सांगितले, पण काही उपयोग झाला नाही.
मुंबई - जे आले त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नाही. त्यांची बांधिलकी मतदारसंघाशी आहे. मतदारसंघात काम करायची असेल तर निधी हवा. मतदारांना सामोरं जायचं आहे. त्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत. सरकारमध्ये होतो, मुख्यमंत्री आपला होता तरीही अपेक्षेप्रमाणे कामं झाली नाहीत. निवडणुकीत चौथ्या नंबरवर शिवसेना गेली. ज्या सरकारमध्ये शिवसेना आहे त्यात शिवसैनिकांना काय मिळाले? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.
आमदार संजय शिरसाट यांनी आयोजित केलेल्या शिवसैनिक मेळाव्यात शिंदे बोलत होते. मध्यरात्री १ च्या सुमारास रवींद्र नाट्यमंदिरात मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले गेले. अधिकार असताना, सरकार असताना आम्हाला शिवसैनिकांना मदत करता आली नाही. बाळासाहेब म्हणाले होते, सत्तेत असताना शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागता कामा नये. आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय. मी माझ्या पक्षाशी काँग्रेस होऊ देणार नाही असं बाळासाहेबांनी सांगितले होते. तेच बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातोय असं त्यांनी म्हटलं.
तसेच गुवाहाटीत बऱ्याच लोकांच्या कलागुणांना वाव देणारं प्लॅटफॉर्म झालं होतं. संजय सिरसाट यांचं सगळं ओके आहे. औरंगाबादहून प्रवास करून सगळे इथे आलेत. मध्यरात्री दीड वाजता कुणाचा असा मेळावा झाला नसेल. आम्ही ऐतिहासिक घटना केली आणि तुमचा ऐतिहासिक मेळावा आहे. ज्या घडामोडी झाल्या ऐतिहासिक होत्या. त्यांची नोंद फक्त राज्याने नव्हे, देशाने नव्हे तर जगातही घेतली गेली. रोज टीव्हीवर एकनाथ शिंदे आणि त्यांची ५० माणसं दिसत होती. रोज एक-एक वाढत होती. ५० झाल्यावर बोललो आता थांबवूया आणि मुंबईत वाढवूया. दबावाने माणसानं नेली असा आरोप झाला. परंतु त्याठिकाणी सगळे स्वइच्छेने आले होते असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, कुठलीही गोष्ट करायची असेल तर त्याला योग्य वेळ असते. आम्ही प्रयत्न खूप केले. जे आम्ही केले ते २०१९ च्या निकालानंतर व्हायला हवं होतं. परंतु दुर्दैवाने ते झाले नाही. त्यावेळीही आमचे आमदार आपण चुकीच्या मार्गाने चाललोय असं सांगत होते. सहा महिन्यातच आपल्याला कळू लागलं. जे सोबत होते ते आपल्याला संपवायला निघाले. मी अनेकदा सांगितले काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा, हे घातक आहे सांगितले, पण काही उपयोग झाला नाही. ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिले त्यांना काय तोंड देणार? असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.