संभाजी भिडे यांच्या भेटीनंतर काय म्हणाले उदयनराजे !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 04:22 PM2019-08-30T16:22:16+5:302019-08-30T16:23:12+5:30

काही दिवसांपूर्वीच उदयनराजे यांचे चुलत भाऊ शिवेंद्रसिंहराजे देखील भाजपमध्ये सामील झाले. तर रामराजे निंबाळकरही भाजपच्याच वाटेवर आहेत. आता उदयनराजेही त्याच मार्गाने निघाले आहेत.

What did Udayan Raje say after meeting with Sambhaji Bhide! | संभाजी भिडे यांच्या भेटीनंतर काय म्हणाले उदयनराजे !

संभाजी भिडे यांच्या भेटीनंतर काय म्हणाले उदयनराजे !

googlenewsNext

मुंबई - साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू झाली आहे. उदयनराजे देखील भाजप प्रवेशावर ठाम असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात अस्वस्थता आहे. आता उदनयनराजे काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यातच उदयनराजे यांनी संभाजी भिडे यांची भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा मतदारसंघातून उदयनराजे सलग दुसऱ्यांदा खासदार झाले आहेत. उदयनराजे यांना पाडण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने यावेळी संपूर्ण ताकद लावली होती. त्यामुळे उदयनराजेंच्या पराभवाची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतु, सातारकरांनी उदयनराजे आणि राष्ट्रवादीवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला. सलग चार लोकसभा निवडणुकीपासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. तर उदयनराजे २००९ आणि २०१४ मध्ये या मतदार संघातून निवडून आले आहेत.

उदयनराजे यांच्या जलमंदिर या निवासस्थानी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी भेट घेतली. त्यामुळे उदयनराजे यांची भाजपची प्रवेशाची तयारी पूर्ण झाली, अशी चर्चा साताऱ्यात सुरू आहे. या संदर्भात उदयनराजे यांना विचारले असते, ते म्हणाले की, जलमंदिर हे काही माझ्या एकट्याचे घर नाही. मला भेटण्यासाठी कोणीही येऊ शकते. भिडे गुरुजी माझ्या घरातले आहेत. ते मला भेटायला येणारच, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांना भाजप प्रवेशाच्या तारखेविषयी छेडले असता, अद्याप तसं काहीही नाही, असं ते म्हणाले.

मागील काही दिवसांत राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांनी पक्षांतर केले. आतापर्यंत ३० हून अधिक राष्ट्रवादीचे नेते भाजप आणि शिवसेनेत दाखल झाले आहेत. यामध्ये अनेक विद्यमान आमदारांचा समावेश होता. काही दिवसांपूर्वीच उदयनराजे यांचे चुलत भाऊ शिवेंद्रसिंहराजे देखील भाजपमध्ये सामील झाले. तर रामराजे निंबाळकरही भाजपच्याच वाटेवर आहेत. आता उदयनराजेही त्याच मार्गाने निघाले आहेत. उदयनराजे यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याचवेळी त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

Web Title: What did Udayan Raje say after meeting with Sambhaji Bhide!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.