सामान्यांची छळवणूक थांबविण्यासाठी काय केले?
By admin | Published: July 13, 2017 05:33 AM2017-07-13T05:33:26+5:302017-07-13T05:33:26+5:30
वाहतूक पोलीस भ्रष्टाचारामुळे सामान्यांचा पोलिसांवरून उडालेला विश्वास पुन्हा बसविण्यासाठी काहीतरी करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने वाहतूक पोलिसांना केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाहतूक पोलीस भ्रष्टाचारामुळे सामान्यांचा पोलिसांवरून उडालेला विश्वास पुन्हा बसविण्यासाठी काहीतरी करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने वाहतूक पोलिसांना केली. लाच मागण्यासाठी सामान्यांची होणारी छळवणूक थांबविण्यासाठी व लाच स्वीकारून, ‘नो पार्किंग’ झोनमध्येही वाहनांना पार्क करण्याची परवानगी देऊन पादचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी काय पावले उचलली? असे विचारत न्यायालयाने सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक पोलीस विभाग) यांना तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. चार वर्षांपूर्वी वाहतूक विभागात काम करणारे सुनील टोके यांनी, वाहतूक विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सीडीमध्ये लाच स्वीकारताना दिसत असलेल्या पोलिसांची चौकशी व्हावी, अशी मागणीही टोके यांनी याचिकेद्वारे केली. त्यावरील सुनावणी न्या. आर. एम. सावंत व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे होती. टोके यांच्या तक्रारींसंदर्भात वाहतूक पोलीस विभागच चौकशी करत असल्याबद्दल, न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. आपल्याच खात्यातील लोकांना वाचविण्यासाठी ते कर्तव्यबद्ध आहेत, असा टोलाही अधिकाऱ्यांना लगावला. ‘पोलिसांनी लाच मागितल्याने सामान्यांची होणारी छळवणूक थांबविण्यासाठी काय केले ? तसेच पोलिसाने लाच मागितल्याची तक्रार आल्यास काय केले जाते ? याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे द्या,’ असे निर्देश न्यायालाने वाहतूक विभाग सहायुक्त अमितेश कुमार यांना देत, याचिकेवरील पुढील सुनावणी तीन आठवड्यांनी ठेवली.