कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 05:51 AM2024-11-27T05:51:16+5:302024-11-27T05:52:03+5:30

दोन मतदारसंघांमध्ये दोन पक्षांत जाणार की पुन्हा एकाच छत्राखाली जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांमध्येही कोणता झेंडा घेऊ हाती, असा संभ्रम निर्माण झाला असून तो कोण दूर करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

What discussions in political circles, what will Ganesh Naik, Sandeep Naik do now, Uddhav Sena candidate Subhash Bhoir go for Devdarshan | कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार

कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार

एका छताखाली कोणता झेंडा हाती?

विधानसभा निवडणुकीत नाईक समर्थक कार्यकर्ते दोन पक्षांत विभागले गेले. ऐरोलीत भाजप आणि बेलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे काम कार्यकर्त्यांनी केले. काही कार्यकर्त्यांना सकाळी भाजपचा गमछा घालून ऐरोलीत प्रचार करावा लागायचा, तर सायंकाळी तुतारीचा गमछा गळ्यात अडकवावा लागत होता. आता येत्या काही महिन्यांत महानगरपालिकेची निवडणूक येणार आहे. यामुळे आता नाईक समर्थक कार्यकर्ते कोणत्या पक्षातून लढणार? दोन मतदारसंघांमध्ये दोन पक्षांत जाणार की पुन्हा एकाच छत्राखाली जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांमध्येही कोणता झेंडा घेऊ हाती, असा संभ्रम निर्माण झाला असून तो कोण दूर करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आता काय करणार? देवदर्शन!

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील उद्धवसेनेचे उमेदवार सुभाष भोईर यांचा पराभव झाला. मतदान होताच ते गाणगापूर येथे दत्त दर्शनाला गेले. दर पौर्णिमेला ते तेथे जातात, पण यावेळी पौर्णिमा नसतानाही ते गेले. मतमोजणीच्या दिवशी भोईर आले. मतमोजणीच्या फेऱ्या जसजशा पुढे सरकल्या तसतशी भोईर यांना काय होणार याची जाणीव झाली. मतमोजणी केंद्रातील पक्षाचे नेते, पत्रकार अशा सगळ्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर निघताना एका पदाधिकाऱ्याने त्यांना आता काय करणार, असे विचारले. त्यावर मिश्किलपणे हसून देवदर्शन करत बसणार, असे ते म्हणताच जोरदार हशा पिकला. निवडणुकीत हार-जीत होतच असते, बघूया पुढे काय होत ते, असे सांगून भोईर निघून गेले.

मुहूर्त सांगणारे ज्योतिषी 

मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होत नसताना मुख्यमंत्री कोण होणार आणि मुख्यमंत्रिपदाची शपथ कधी घेतली जाणार, याबाबत विविध नेत्यांचे समर्थक आणि नेतेही दावे प्रतिदावे करत आहेत. जणू हे समर्थक आणि नेते सध्या ज्योतिषाच्या भूमिकेत आहेत. रामदास आठवलेंनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, हे जाहीर करून टाकले, तर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शपथविधीचा मुहूर्त सांगून टाकला. दानवेंच्या दाव्यानुसार ३०  नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रिपदाचे नाव निश्चित होईल आणि डिसेंबरमध्ये शपथविधी होईल, असे जाहीर केले आहे.

रामदास आठवलेंचे अनाहूत सल्ले

देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून कायम मंत्रीपद  मिळत असलेले रिपाइं आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा मार्मिक सल्ला दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी रिपाइंचे नेतृत्व करावे, शरद पवार यांनी रालोआमध्ये सामील व्हावे, अशा सूचना आठवले अधूनमधून करत असतात. आठवले यांनी यावेळी थेट काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रात मंत्री व्हावे, असा सल्ला दिला. यामुळे आता राज्याच्या राजकीय वर्तुळात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली.

देव कोणाला पावणार?

एकीकडे राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय होत नाही. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून या दोन्ही नेत्यांचे समर्थक देवापुढे साकडे घालत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांच्या समर्थकांनी नागपूर येथील टेकडी गणपतीला साकडे घातले, तर छत्रपती संभाजीनगर येथे महाआरती केली. तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून शिंदे समर्थकांनी मुंबईतील सिद्धिविनायक, त्र्यंबकेश्वर, तुळजाभवानीला साकडे घातले. कोणाच्या समर्थकांना देव पावणार, अशी कुजबुज आहे.

(कुजबुजसाठी दीपक भातुसे, नामदेव मोरे, सुरेश ठमके, अनिकेत घमंडी यांनी लेखन केले आहे.)

Web Title: What discussions in political circles, what will Ganesh Naik, Sandeep Naik do now, Uddhav Sena candidate Subhash Bhoir go for Devdarshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.