बोटाला शाई लावून काय साधणार?
By admin | Published: November 16, 2016 06:14 AM2016-11-16T06:14:39+5:302016-11-16T06:14:39+5:30
रद्द झालेल्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी येणाऱ्यांच्या बोटाला, मतदानाच्या वेळी लावतात तशी, शाई लावण्याचा निर्णय सरकारने
अजित गोगटे / मुंबई
रद्द झालेल्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी येणाऱ्यांच्या बोटाला, मतदानाच्या वेळी लावतात तशी, शाई लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय प्रामुख्याने तीन उद्देशांनी घेण्यात आला आहे. १) रोजंदारीवर लोकांना कामाला ठेवून प्रत्येकी ४,५०० रुपये याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर नोटा बदलून घेण्याच्या काळा पैसेवाल्यांनी शोधलेली पळवाट बंद करणे. २) लोकांनी पुन्हा-पुन्हा बँकांमध्ये येऊन पैसे काढण्यास आळा घालणे आणि ३) बँकांच्या बाहेर लागणाऱ्या रांगा कमी करणे, परंतु या उपायाने ही उद्दिष्टे कशी काय साध्य होणार, हा प्रश्न असून, उलट याचा प्रामाणिकपणे व्यवहार करायला जाणाऱ्यांनाच जास्त त्रास होईल, असे दिसते.
पहिली गोष्ट अशी की, पैसे बदलून घेण्यासाठी बँकेत खाते असलेच पाहिजे, असे बंधन नाही. विशेषत: देशभरातील दीड लाखांहून अधिक पोस्ट आॅफिसांबाहेर लागणाऱ्या रांगा, या बहुतांश बँकांमध्ये खाते नसलेल्या लोकांच्याच आहेत. अनेकांनी दिवसाला ३०० रुपये रोजंदार देऊन, पैसे बदलून घेण्यासाठी माणसे कामाला लावल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ३०० रुपयांमध्ये चार हजार रुपये काळ््याचे पांढरे करून घेण्याचा हा रासरोस धंदा आहे. बोटाला शाई लावल्याने, या प्रकारास फारसा आळा बसेल, असे दिसत नाही. दिवसभर मोलमजुरी करून ३०० रुपये न मिळणारे लाखो बेरोजगार या देशात उपलब्ध आहेत. एकाच शहरातील १०-२० बँकांमध्ये रांगा लावण्यासाठी पाठविलेल्या भाडोत्री लोकांच्या बोटाला शई लागल्यावर त्यांच्याजागी, दुसऱ्या दिवशी पुन्हा रांग लावण्यासाठी नवे रोजंदार सहज मिळू शकतात.
ज्यांचे बँकेत खाते आहे त्यांच्यादृष्टीने बोटाला शाई लावणे निरर्थक आहे. कारण अशा लोकांनी आधी पैसे बदलून घेतले असतील तर त्याची नोंद खात्यात लगेच दिसेल व त्यांचे पुन्हा पैसे बदलून घेणे, शाई न लावताही रोखता येऊ शकेल.
लोकांनी पुन्हा पुन्हा पैसे काढण्यासाठी बँकेत येऊ नये यासाठी शाई लावणे हे जखमेवर मीठ चोळणे ठरेल. कारण मुळात खातेदारांना त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम असूनही बँकेतून किंवा एटीएमने हवे तेवढे पैसे काढू न देणे हेच मुळात अन्यायकारक आहे. त्यातून आठवड्याला मिळू शकणारे २४ हजार रुपये, गरज असो वा नसो, एकदाच घेऊन जा; पुन्हा पुन्हा येऊ नका, असे सांगणे हे गरजवंतांच्या अडचणींचा गैरफायदा घेणे आहे.
बँकांच्या बाहेर लागणाऱ्या रांगा कमी करण्यावर बोटाला शाई लावणे हा नव्हे तर नव्या, पर्यायी नोटा मुबलक प्रमाणावर उपलब्ध करून देणे आणि मुख्य म्हणजे एटीएममधून त्या मिळतील याची व्यवस्था करणे हा त्यावर उपाय आहे. बँकवाल्यांनी ज्यांच्या बोटाला शाई आहे अशांना रांगांमधून बाहेर काढण्यास सुरुवात केली तर कदाचित त्याचा परिणाम लोकांचा संयमाचा बांध फुटण्यात होऊ शकेल.