भाजपला 'एक हैं, तो सेफ हैं' अशा जाहिराती देऊन काय साध्य करायचे आहे? नितीन गडकरी स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 03:55 PM2024-11-11T15:55:34+5:302024-11-11T15:57:32+5:30
"...तर आपण सेफ आहोत आणि भारतीय म्हणजे सर्वच आहेत"
राज्यात विधानसभा निवडणुकीचा आखाडा चांगलाच रंगात आला आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध प्रकारच्या घोषणाही दिल्या जात आहेत. यातच, भाजपकडूनही 'एक हैं, तो सेफ हैं' अशी घोषणा देण्यात आली. याची राजकीय वर्तुळात चर्चाही सुरू आहे. यासंदर्भात आता, भाजप नेते नितीन गडकरी यांनीही भाष्य केले आहे. "जर या देशात जात, पंथ, धर्म, भाषा सोडून आपण सर्वजन भारतीय म्हणून एक राहिलो, तर आपण सेफ आहोत आणि भारतीय म्हणजे सर्वच आहेत," असे गडकरी यांनी म्हटले आहे.
भाजपला लव्ह जिहाद असो अथवा वर्तमानपत्रांमध्ये 'एक हैं, तो सेफ हैं' अशा जाहिराती देऊन नेमके काय साध्य करायचे आहे या निवडणुकीत? असा प्रश्न विचारला असता गडकरी म्हणाले, "जर या देशात जात, पंथ, धर्म, भाषा सोडून आपण सर्वजन भारतीय म्हणून एक राहिलो, तर आपण सेफ आहोत. आणि भारतीय म्हणजे सर्वच आहेत. काही लोकं काय आहेत, अँटी मुस्लीम असा अर्थ काढतात. तो नाही. आम्ही अँटी मुस्लीम नाही, अँटी दलित नाही, अंटी शिख नाही. आम्ही बहू संख्याक आणि अल्पसंख्याक मानत नाही. आम्ही सर्वजन एक आहोत, आम्ही सर्वजन एका समाजाचे अंग आहोत. आमचा इतिहास, संकृती आणि वारसा एक आहे. आम्ही गुरुद्वाऱ्यात जाऊनही पाया पडतो." गडकरी एका मुलाखतीदरम्यान एबीपी माझासोबत बोलत होते.
गडकरी पुढे म्हणाले, "एक दिवस मला वाटले की, येथे सुलेखा ताई कुंभारेंनी एक गौतम बुद्धांचे टेम्पल बांधले आहे. मी आणि माझ्या पत्नीने तेथे जाऊन एक तास बसून ध्यान केलं. मला भगवान गौतम बुद्धाची पूजा करताना, चिंतन करताना जेवढा आनंद मिळतो तेवढाच विवेकानंदांच्या प्रतिमे समोर बसताना अथवा रामाच्या मंदिरात जाऊनही तोच आनंद मिळतो."
एवढेच नाही तर, "मला असे वाटते की, हे व्यवस्थित समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि मीडियाने विशेषतः यात विभाजन करण्या पेक्षा या विचारामागे असणारे एकात्म दर्शन लोकांपर्यंत पोहोचवले, तर खरा अर्थ त्यातून जाईल," असेही गडकरी म्हणाले.