‘ती’ सध्या काय करते ?

By admin | Published: January 22, 2017 12:22 AM2017-01-22T00:22:01+5:302017-01-22T00:22:01+5:30

एकीकडं ‘आघाडी’ होत नव्हती. दुसरीकडं ‘युती’ जुळत नव्हती. त्यामुळं साऱ्याच पक्षांच्या कार्यालयात सामसूम होती. कुणीच काही बोलत नव्हतं. तेव्हा ‘च्यानल’वाल्यांनी टूम

What does she do now? | ‘ती’ सध्या काय करते ?

‘ती’ सध्या काय करते ?

Next

- सचिन जवळकोटे

एकीकडं ‘आघाडी’ होत नव्हती. दुसरीकडं ‘युती’ जुळत नव्हती. त्यामुळं साऱ्याच पक्षांच्या कार्यालयात सामसूम होती. कुणीच काही बोलत नव्हतं. तेव्हा ‘च्यानल’वाल्यांनी टूम काढली. ‘बे्रकिंग’साठी ‘ती सध्या काय करते?’ हा सध्याचा फेमस प्रश्न विचारुन नेत्यांना बोलतं करू या. मग टीम निघाली.
प्रसंग एक : टीम सर्वप्रथम बारामतीत पोहोचली. थोरल्या काकांसमोर ‘बुम’ धरून त्यांनी प्रश्न विचारला, ‘ती सध्या काय करते?’ खरंतर, हा प्रश्न आपल्या ‘आघाडी’बद्दल आहे, हे ओळखूनही काका गालातल्या गालात हसले. हाताची घडी बांधून विषयाला बगल देत त्यांनी दुसराच मुद्दा उपस्थित केला, ‘ती सध्या प्रचंड घटलीय. दीड महिन्यात प्रचंड उतरलीय. कारण बँकांच्या रांगेत रोज शिव्याशाप ऐकतेय. रिकाम्या बाजारपेठेत तळतळाट घेतेय.’
हे ऐकून ‘च्यानल’वाले बुचकळ्यात पडले. एवढा ‘बॅड पॅच’ अनुभवणारी ‘ती’ कोण?, असा प्रश्न त्यांच्या समोर पडला. तेव्हा कानाला लावलेला हेड फोन बाजूला सारत एक ‘क्यामेरा’मन कुजबुजला, ‘अरेऽऽ यार... ती बोले तो नमो की क्रेझ. इतना भी समझ मे नही आया क्या ?’
प्रसंग दोन : दुसऱ्या टीमला जाता-जाता अजून एक नेते आठवले. ते म्हणजे रामदासभाई. त्यांना भेटून टीमनं विचारलं, ‘ती सध्या काय करते?’ तेव्हा डोळे मिटून गालावरून हात फिरवत नेते शांतपणे म्हणाले, ‘ती सध्या चांगलीच सुटलीय, कारण तिला चांगले दिवस आलेत. वाटल्यास नमोंना न्याहाळा. खोतांना भेटा. शेट्टींना विचारा. जानकरांकडून कन्फर्मकरा. अगदी माझीही बघा. ती सध्या एकदम मस्त दिसतेय.’ टीम पार गोंधळात. तेव्हा कवीवर्यांनीच त्यांच्या खास स्टाईलमध्ये कविता सादर करून तिचं दर्शन दिलं, ‘इसके पास भी ती है.. उसके पास के पास भी ती है.. जिसको जिसको भी दाढी है, उसको उसको कुर्सी मिली है!’
प्रसंग तीन : तिसरी टीम ‘वर्षा’वर पोहोचली. तिथं देवेंद्रपंत नवनव्या रंगांच्या डझनभर जाकिटांची पाहणी करण्यात गुंतलेले. ‘ती सध्या काय करते?’ हा प्रश्न आपल्या ‘युती’ बद्दल आहे, हे उमजूनही पंत वेगळंच बोलू लागले. जाकिटाचं बटण कुरवाळत विरोधकांच्या स्टाईलमध्येच चढ्या आवाजात सांगू लागले, ‘ती एकदम मस्त आहे. धनुष्यवाल्यांचा सामना दिल्लीवाल्यांशी रंगला तरी आतून माझ्यासोबत एकदम प्रामाणिक आहे. किरीटवर जाळ अन् आशिषवर राग निघाला तरी ती माझ्याबाबतीत एकदम सॉफ्ट आहे.’
हे ऐकून ही टीमही गोंधळली. ‘आतून एक अन् बाहेरून एक, असं दोन-दोन रुपं दाखविणारी पंतांची ती कोण ?’ असा प्रश्न उभा ठाकला. तेव्हा, शेजारीच उभारलेल्या एकानं गुपीत उलगडलं, ‘अहोऽऽ ती म्हणजे उद्धोंसोबतची मैत्री. दोन्ही पक्षांत कितीही पेटलं तरी या दोघांची फ्रेंडशिप म्हणे एकदम अतूट. ती दोस्ती तुटायची नाय.’
प्रसंग चार : शेवटची टीम बारामतीच्या धाकट्या पुतण्यांना भेटली. ‘दादाऽऽ ती सध्या काय करतेय?’ हे ऐकताच दादा नेहमीप्रमाणं सटकले; मात्र आजपर्यंतचा मीडियाचा अनुभव लक्षात घेऊन धुसफुसत शांत राहिले. मग त्यांनी संशयांंनं डोळे किलकिले करत करत प्रतिप्रश्न केला, ‘तुम्हाला ती म्हणजे नेमकी कोण अपेक्षित आहे? ती म्हणजे धरणातल्या पाण्याची पातळी का?’ टीमनं नकारार्थी मान हलवली. तेव्हा दादा निक्षून म्हणाले, ‘मग नक्कीच ती म्हणजे माझी जीभ असणार. पण तुम्हाला सांगतो, यंदाच्या निवडणुकीत माझी ती घसरणार नाही म्हणजे घसरणार नाहीच. कारण ती सध्या विश्रांती करतेय.’ मग मंडळी.... आलं लक्षात? ती सध्या काय करते ?

 

Web Title: What does she do now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.