ठाकरे सरकारच्या शपथविधीचा खर्च नेमका किती? ताळमेळच लागेना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 06:12 AM2020-02-13T06:12:48+5:302020-02-13T06:13:10+5:30
आरटीआयमध्ये उलटसुलट माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या शपथविधीसाठी किती खर्च आला, याची नेमकी आकडेवारी संबंधित विभागाकडे नाही. माहिती अधिकार कायद्यांतर्गत याबाबत दिलेल्या माहितीत तफावत आढळून आली.
सामान्य प्रशासन विभागाने ‘आरटीआय’मध्ये २ कोटी ७९ लाख खर्च झाल्याचे कळविले आहे तर प्रथम अपिलात ४ कोटी ६३ लाख खर्च झाल्याचे सांगितल्याने गोंधळ निर्माण झाला. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिळविलेल्या अर्जातून ही माहिती पुढे आली आहे.
सरकारचा शपथविधी दोन टप्प्यांत झाला आहे. पहिल्यांदा मुख्यमंत्री ठाकरे व सहा मंत्र्यांचा तर नंतर उर्वरित मंत्रिमंडळाचा विधान भवनामध्ये शपथविधी झाला. त्यासाठी आलेल्या खर्चाबाबत ‘आरटीआय’अंतर्गत अनेक अर्ज सामान्य प्रशासनाच्या राजशिष्टाचार विभागाकडे करण्यात आले. गलगली यांच्या अर्जावर विभागाचे कक्ष अधिकारी आर. आर. गायकवाड यांनी खर्च २ कोटी ७९ लाख रुपये झाल्याचे कळविले. त्याबाबत अपील केल्यानंतर अपील अधिकारी अजय बोस यांनी खर्च ४ कोटी ६३ लाख झाल्याची माहिती दिली. त्यामुळे अचूक माहिती सरकारने माहिती अधिकार कायदा अधिनियम २००४ चे कलम ४ अंतर्गत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशी मागणी गलगली यांनी केली.