युद्धकैद्याला अटक झाल्यास नेमकी काय वागणूक मिळते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 06:02 AM2019-03-02T06:02:24+5:302019-03-02T06:02:36+5:30
शत्रूच्या हातात सापडलेल्या युद्धकैद्याला अटक झाल्यानंतर नेमकी काय वागणूक मिळते, त्याच्याकडून शत्रू माहिती काढून घेण्यासाठी कसे प्रयत्न करतो, अशा अनेक शंकांना गु्रप कॅप्टन दिलीप परुळकर (निवृत्त) यांनी दिलेली उत्तरे. ते स्वत: १९७१ च्या युद्धात पाकिस्तानच्या कैदेत होते.
शत्रूच्या ताब्यात युद्धबंद्यांना काय वागणूक मिळते?
युद्धकैद्याने पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास काय शिक्षा होते?
जीनिव्हा करारानुसार युद्धकैद्याला वागणूक देण्याची नियमावली आहे. त्यांना मारहाण, यातना तसेच छळ करणे, यास प्रतिबंध आहे. मात्र, अनेकदा कैद्यांची माहिती लपविली जाते. त्याच्याकडून माहिती मिळवण्यासाठी छळ केला जातो. युद्धकैदी पळून जाताना सापडल्यास त्याला महिनाभर अंधाऱ्या खोलीत एकटे ठेवले जाते. माझे विमानही १९७१च्या युद्धात पाकिस्तानमध्ये कोसळले होते. मीही पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही तिघे जण पळून जाण्यास जवळपास यशस्वी झालो होतो. मात्र, आम्हाला पुन्हा अटक करून, वेगळे ठेवण्यात आले.
अभिनंदनच्या बाबतीत काय झाले असेल? माहिती काढण्यासाठी त्याला मारहाण, छळ झाला असेल ?
अभिनंदनचे फोटो जे वृत्तपत्र दाखवण्यात आले, त्यावरून असे वाटते की त्याला मारहाण झाली असावी. आम्ही ज्या ठिकाणी हल्ला करतो त्या ठिकाणी स्फोटकांमुळे मोठा परिसर नष्ट होतो. यात आजूबाजूच्या स्थानिकांचेही नुकसान होते. यामुळे त्यांचा राग साहजिकच असतो. अभिनंदलाही स्थानिकांकडून मारहाण झाली. १९७१च्या युद्धात जे भारताचे जे युद्धकैदी होते त्यांना जवळपास स्थानिक लोकांनी मारहाण केली होती. माझाही हाच अनुभव होता. स्थानिक ‘ये काफीर हे, इसे मार डालो,’ असे म्हणत माझ्यावर धावून आले होते. मात्र, एका पोलिसाने मला वाचविले. तो युनिफॉर्ममध्ये असल्याने तसेच त्याच्याकडे विशेष अधिकार असल्याने त्याने स्थानिकांना ‘ये अपने आर्मी के लिए जिंदा जादा फायदेका है, इससे एअर फोर्सकी जानकारी मिलेगी,’ असे म्हणत जमावापासून मला वाचविले.
युद्धकैद्याला नियमांनुसार अशी वागणूक देणे योग्य आहे का?
युद्धकैद्याला अशी वागणूक देणे जिनिव्हा कराराचे उल्लंघन आहे.
शत्रूच्या सीमेत गेल्यावर, त्यांच्या हाती लागल्यावर काय करायचे, याचे प्रशिक्षण दिले जाते का?
प्रतिकूल परिस्थितीत जिवंत कसे राहायचे, यासाठी सैनिकांना ‘जंगल अॅण्ड स्नो सर्व्हायव्हल’ असा कोर्स असतो. विमान खाली पडल्यास तसेच शत्रूच्या हद्दीत गेल्यावर काय करायचे याचे प्रशिक्षण दिले जाते.
शत्रूच्या यातनांमुळे जीव गमवावा लागल्याच्या घटना आहेत का ?
माझ्या माहितीप्रमाणे हवाई दलात आतापर्यंत अशी घटना झालेली नाही. आम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप सक्षम असतो. आमचे प्रशिक्षण उच्च दर्जाचे असते. लढाईला जाताना मोठी तयारी असते. मी कैदेत सापडलो तेव्हा माझ्या डोक्याला मार लागला होता. मला महिनाभर दिसत नव्हते. त्यानंतरही माझी दृष्टी व्यवस्थित नव्हती. त्यावेळी त्यांनी आम्हाला विरंगुळ्यासाठी पुस्तके दिली होती.
युद्धकैद्याला किती दिवसांत परत त्याच्या मायदेशी पाठवावे, याची काय नियमावली आहे?
अशी काही नियमावली नाही. १९६५ आणि १९७१ च्या युद्धातील अनेक ऑफिसर्स जवानांचे मृतदेह सापडले नाहीत. मृत्यू झाला असावा, असे सांगून त्यांना कैदेत ठेवले होते. त्यांचे नातेवाईक पाकिस्तानात त्यांची चौकशी करून आले आहेत. मात्र, अद्यापही त्यांचा पत्ता लागलेला नाही.
युद्धकैद्याला परत पाठविण्याची काय प्रक्रिया असते?
प्रीझनर्स ऑफ वॉर एक्स्चेंजद्वारे युद्धकैदी एकमेकांना सुपुर्द केले जातात. १९७१ च्या युद्धात भुट्टोंनी भारताचे आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सचे मिळून ७०० सैनिक ताब्यात घेतले होते. भुट्टोंनी आम्हाला सोडले. याच वेळी भारताने पाकिस्तानच्या ९३ हजार युद्धकैद्यांना मुक्त केले होते.