खरा तपास कोणता ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:37 AM2018-08-20T01:37:10+5:302018-08-20T01:37:27+5:30
तपासाला नवे वळण; कोणाच्या पिस्तुलातून झाडल्या गोळ्या
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून त्यांनी शनिवारी सचिन अंदुरे याला अटक केली़ सचिन अंदुरे हा हत्या केलेल्या दोघांपैकी एक जण असल्याचा दावा आज सीबीआयने केला़ त्यामुळे आता यातील आरोपी डॉ़ वीरेंद्रसिंह तावडे याच्यावर आरोपपत्र दाखल करताना विनय पवार आणि सारंग अकोलकर यांनी डॉ़ दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा संशय व्यक्त केला होता़ त्यामुळे आता डॉ़ दाभोलकर यांच्यावर सचिन अंदुरे याने गोळीबार केल्याचा आताचा सीबीआयचा दावा खरा, की तावडे यांच्या आरोपपत्रात केलेला दावा खरा, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे़
कोणत्याही हत्येच्या तपासात पहिल्या ३६ तासांत होणारा तपास महत्त्वाचा असतो़ त्यात जर हत्येचा हेतू, हत्या करणाऱ्यांविषयी काही माहिती हाती लागू शकली तर तो गुन्हा लवकरात लवकर उघडकीस येणे शक्य होते़ परंतु, यात सुरुवातीपासून पुणे पोलीस चाचपडत होते़ त्यानंतर त्यांनी मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांना अटक केली़ त्यातूनच या गुन्ह्याचा तपास भरकटला़ त्यांनी गुन्हेगारांना शस्त्रे विकली पण ती कोणाला हे सांगू शकले नाही़ बॅलेस्टिक रिपोर्टचा आधार घेऊन त्यांना अटक दाखविली गेली़ नागोरी व खंडेलवाल ताब्यात असताना एटीएसने तब्बल ४७ पिस्तुल जप्त केली़ त्यातील एका पिस्तुलाने दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्यात आल्याचे बॅलेस्टिक रिपोर्टद्वारे निष्पन्न झाले़ परंतु, त्यांनी हे पिस्तुल कोणाला विकण्यात आले होते़ हे मात्र शेवटपर्यंत कळू शकले नाही़ सबळ पुरावा उपलब्ध न झाल्याने शेवटी त्यांना जामीन मिळाला़ उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला़ कोल्हापूरमधील साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार सीबीआयने सनातन साधक डॉ़ वीरेंद्रसिंह तावडे याला अटक केली़ त्याच्याविरुद्ध पुणे न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले़ या आरोपपत्रात तावडे हा या कटामागचा मुख्य सूत्रधार असून त्याच्यावर कट रचणे आणि हत्या करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत़ त्याने विनय पवार आणि सारंग अकोलकर यांच्या सहाय्याने हा कट रचून दाभोलकर यांची हत्या केल्याचे त्यात म्हटले आहे़ विनय पवार आणि सारंग अकोलकर हे फरार असून त्यांचा शोध घेतला जात असल्याचे सांगितले होते़ त्यानंतर या दोघांविषयी माहिती मिळावी, यासाठी त्यांनी राज्यभर पोस्टर लावून माहिती देणाºयांना बक्षीसही जाहीर केले होते़
त्यानंतर आता सचिन अंदुरे याला याच प्रकरणात अटक केली आहे़ जर तावडे हा सूत्रधार असेल व त्याने विनय पवार व सारंग अकोलकर यांनी गोळ्या झाडल्या असतील तर मग सचिन अंदुरे गोळ्या झाडणारा तिसरी व्यक्ती ठरते़ पण आतापर्यंतच्या तपासात गोळ्या झाडणारे हे दोघेच होते़ मग नेमक्या गोळ्या कोणी झाडल्या़ विनय पवार व सारंग अकोलकर की, सचिन अंदुरे यांनी असा संभ्रम निर्माण झाला आहे़
याबाबत सीबीआयचे म्हणणे आहे, की वीरेंद्रसिंह तावडे हा सूत्रधार असला तरी त्याच्या आरोपपत्रात विनय पवार व सारंग अकोलकर यांच्यावर संशय व्यक्त केला आहे़ प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेले वर्णन आणि या दोघांचे वर्णन मिळतेजुळते असल्याने त्यांच्यावर संशय आहे़ हे दोघेही तावडेशी संपर्कात होते़ पण ते अजूनही मिळून न आल्याने ते हत्येच्या वेळी तेथे होते की नाही, याची शहानिशा अजून करता आली नाही़
पिस्तुलाबाबत संभ्रम
आणखी एक मुद्दा संभ्रमित करणारा हा तो पिस्तुलाचा. जर नागोरी व खंडेलवाल यांच्याकडील पिस्तुलातून दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या असतील व ते डेक्कन पोलीस ठाण्यात जमा असेल तर त्याच पिस्तुलाने कॉ़ गोविंंद पानसरे यांच्यावर कशा काय गोळ्या झाडल्या जाऊ शकतील़ तसेच जर सचिन अंदुरे व त्याच्या साथीदाराने गोळ्या झाडल्या असतील तर मग त्यांनी कोणत्या पिस्तुलातून गोळ्या झाडल्या, असा प्रश्न पुढे आला आहे़