दिल्लीत काय घडले? राज ठाकरेंनी दोन जागा मागितल्या; अमित शाह यांनी विधानसभेचाही शब्द देणे टाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 09:21 AM2024-03-20T09:21:19+5:302024-03-20T09:24:04+5:30
Raj Thackeray-Amit Shah Meeting: राज ठाकरेंची मनसे किती जागा लढविणार ते महापालिका, विधानसभा निवडणुकीचे काय ठरणार यावरही चर्चा रंगली होती. आता या दोघांच्या बैठकीत काय ठरले याची माहिती समोर येत आहे.
मंगळवारचा दिवस राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याच्या चर्चेचा ठरला. राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत काय झाले, याचबरोबर राज ठाकरे एनडीएत (महायुतीत) जाणार की नाही याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. राज ठाकरेंची मनसे किती जागा लढविणार ते महापालिका, विधानसभा निवडणुकीचे काय ठरणार यावरही चर्चा रंगली होती. आता या दोघांच्या बैठकीत काय ठरले याची माहिती समोर येत आहे.
राज ठाकरे यांनी अमित शाह यांच्याकडे लोकसभेच्या दोन जागांचा प्रस्ताव ठेवल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. राज यांनी दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई जागेचा प्रस्ताव ठेवला होता. यावर शाह यांनी एकच जागा शक्य असल्याचे सांगितले आहे. तर दुसरी जागा देणे कठीण असल्याचे म्हटले. यानंतर राज यांनी लोकसभेनंतर पुढे काय, असे विचारले. यावर सध्या कोणताही शब्द देणे शक्य नसल्याचेही शाह यांनी म्हटल्याचे समजते आहे.
विधानसभा एकत्र लढवू, परंतु तेव्हाचे तेव्हा ठरवू असे अमित शाह यांनी राज यांना म्हटल्याचे समजते आहे. राज यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आधी यासंबंधी चर्चा केली होती. यानंतरच ते दिल्लीला जायला तयार झाले होते. मुंबईतील बैठकीत मनसेने तीन जागांचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु तिथे याला नकार देण्यात आला होता. यानंतर दोन जागांचाही प्रस्ताव शाह यांनी फेटाळला आहे.
मनसेची ताकद किती?
राज ठाकरे कोणता निर्णय घेतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ३६ पैकी केवळ २५ मतदारसंघांत निवडणूक लढवत मिळवलेली पाच लाखांच्या आसपास मते मिळाली होती. तेवढी मते येत्या लोकसभा निवडणुकीत मनसेला मिळणार का? व मिळाली तर कुणाच्या विजयात मोजली जाणार हा चर्चेचा विषय आहे. मनसेचे उमेदवार २०१९ मध्ये माहीम, मागाठाणे, शिवडी, मुलुंड, भांडूप, घाटकोपर पूर्व आणि पश्चिम या सात ठिकाणी दुसऱ्या स्थानावर होते, तर १५ ठिकाणी तिसऱ्या स्थानावर होते. य़ामुळे मनसेची मते निर्णायक ठरतील अशी अपेक्षा भाजपाला आहे.