रायगडमध्ये हेलिकॉप्टरमध्ये बसताना घडले ते आश्चर्यकारक - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 02:24 PM2017-07-26T14:24:22+5:302017-07-26T15:22:39+5:30
मागच्या दोन महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोनवेळा हॅलिकॉप्टर अपघातातून सुदैवाने बचावले. याविषयी बुधवारी राज्याच्या विधानपरिषदेत चर्चा झाली.
मुंबई, दि. 26 - मागच्या दोन महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोनवेळा हेलिकॉप्टर अपघातातून सुदैवाने बचावले. याविषयी बुधवारी राज्याच्या विधानपरिषदेत चर्चा झाली. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडमध्ये हेलिकॉप्टरमध्ये बसताना जे घडले त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. लोकमतनेच सर्वप्रथम यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध केले होते.
हेलिकॉप्टर बंद झाल्यानंतर आपण उतरतो तसेच हेलिकॉप्टरमध्ये सर्व बसल्यानंतर उड्डाण घेण्याची प्रक्रिया सुरु होते. पण रायगडमध्ये हेलिकॉप्टर सुरु ठेवून बसण्यास सांगण्यात आले त्याचे आश्चर्य वाटते असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रकरणाची डीजीसीएने नेमलेल्या तपास पथकाकडून चौकशी सुरु आहे. स्वतंत्र समितीकडून तपास सुरु आहे. त्यामुळे लवकरच तथ्य समोर येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आज विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सभापतींकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. राज्याच्या प्रमुखाच्या हेलिकॉप्टरबरोबर असे घडत असेल तर सखोल चौकशी होणे गरजेचे आहे असे मुंडे म्हणाले.
काय घडले रायगडमध्ये
सात जुलै रोजी मुख्यमंत्री अलिबाग येथे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उदघाटन सोहळा आटोपून डोलवि-धरमतर येथील जेएसडब्ल्यू ईस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी १.५५ वाजण्याच्या सुमारास हेलिकप्टर मध्ये बसण्याकरीता चढत असतानाच हेलिकॉप्टरने अचानक टेक ऑफ घेण्यास प्रारंभ केला. हेलिकॉप्टरचा पंखा फडणवीस यांच्या डोक्याला लागण्याआधीच उपस्थित वरिष्ठ सुरक्षा रक्षक व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना बाजूला घेतल्याने ते थोडक्यात बचावले असल्याचे प्रत्यक्षदशीर्ने सांगितले.
लातुरात हेलिकॉप्टर कोसळले; मुख्यमंत्री बचावले!
25 मे रोजी लातुरात मुख्यमंत्री आणि त्यांचा ताफा पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी जमलेल्या प्रचंड गर्दीवर धूळ उडवत मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर मुंबईच्या दिशेने झेपावले आणि काही क्षणात ते जवळच्याच झोपडपट्टीतील रस्त्यावर कोसळले होते. धुळीचे लोट असल्याने नेमके काय घडले ते कोणालाच कळले नाही... पायलट संजय कर्वे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहा जण बालंबाल बचावले होते. या अपघातात पायलट कर्वे यांच्यासह इतर दोघे नागरिक किरकोळ जखमी झाले होते. निलंगा (जि. लातूर) येथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानाजवळ सकाळी ११.४९ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला होता.