'वाघा'च्या डरकाळीचंं काय झालं
By admin | Published: July 6, 2016 12:24 PM2016-07-06T12:24:41+5:302016-07-06T14:18:52+5:30
'धनुष्यबाण' हे शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्ह असलं तरी 'वाघ' शिवसेनेला त्याहून अधिक प्रिय आहे. जन्मापासून शिवसेनेने स्वत:ला वाघाशी जोडून घेतले.
Next
ऑनलाइन लोकमत
'धनुष्यबाण' हे शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्ह असलं तरी 'वाघ' शिवसेनेला त्याहून अधिक प्रिय आहे. जन्मापासून शिवसेनेने स्वत:ला वाघाशी जोडून घेतले. जंगलात वाघाचा एक दरारा, रुबाब असतो. सहसा वाघाच्या वाटयाला जाण्याची हिम्मत कोणी करत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातही सन २००० पर्यंत शिवसेना तोच दरारा, रुबाब टिकवून होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या दैनंदिन कामकाजात सक्रीय असताना शिवसेनेचं 'वाघपण' जाणवायचे, उठून दिसायचे.
शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत १९९५ ते १९९९ हा साडेचारवर्षांचा काळ सोडता ४२ वर्ष शिवसेनेचे आमदार विधानसभेमध्ये विरोधी बाकावर बसले. राज्यात सत्ता काँग्रेसची असली तरी, शिवसेनेचा एक दरारा होता, वचक होता. जनमानसावर एक पकड होती. शिवसेनाप्रमुखांच्या मुखातून बंद हे शब्द निघाताच संपूर्ण मुंबईतील रस्ते ओस पडायचे. रस्त्यावर एक चिटपाखरुही दिसायचे नाही.
शिवसेनाप्रमुख स्वत:हा सक्रीय असेपर्यंत शिवसेनेच्या डरकाळीने विरोधकांना धडकी भरायची. पण आज वाघाच्या डरकाळीतील ती दहशत, तो दरारा संपला आहे. डरकाळी फुटते ती फक्त 'सामना'च्या अग्रलेखात आणि भाषणात. प्रत्यक्षात या डरकाळीचा विरोधकांवर ना मित्रपक्षांवर कुठला परिणाम होतो. शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरे यांच्या हाती गेल्यानंतर निश्चित शिवसेनेत काही चांगले बदल झाले आहेत. शहरीभागात मर्यादीत असणा-या शिवसेनेचा ग्रामीण भागात विस्तार झाला आहे.
पण शिवसेनेचा म्हणून स्वत:चा एक वचक होता तो आता राहिलेला नाही. मंगळवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारातून ही बाब प्रकर्षाने अधोरेखित झाली. केंद्रात अठरा खासदार असणा-या शिवसेनेला मोदी-शहा जोडगळीने साधे विचारलेही नाही. वास्तविक राजकारणात भाजपचा सर्वाधिक जुना, विश्वासू मित्र कोण असेल, तर ती शिवसेना आहे. भाजपचे दिवगंत नेते प्रमोद महाजन यांच्या प्रयत्नाने ही युती आकाराला आली.
महाराष्ट्रात भाजप वाढली ती शिवसेनेच बोट धरुनच. महाराष्ट्रात भाजपला वाढायला शिवसेनेने मदत जरुर केली पण त्यावेळीही टोले, टोमणे लगावले. शिवसेनाप्रमुख नाराज झाले तर, लालकृष्ण अडवाणीसारखे बडे नेते मातोश्रीवर भेट घ्यायला यायचे. पण बाळासाहेबांनंतर शिवसेनेची आज ही परिस्थिती राहिलेली नाही. भाजपचा आज महाराष्ट्रात स्वत:चा जनाधार तयार झाला आहे. हे कटू वास्तव शिवसेनेने स्वीकारले पाहिजे.
मोठया भावाची भूमिका बदलून आपली सध्या लहान भावाची भूमिका आहे हेच शिवसेना नेतृत्व स्वीकारायला तयार नाही. त्याच भावनेतून शिवसेना सामनामधून जळजळीत टीका करुन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला दुखावते. मग केंद्रात आणि राज्यात संपूर्ण सत्ता हातात असलेली भाजपही शिवसेनेला दुय्यम स्थान दाखवण्याची संधी सोडत नाही. राजकारणात कोणीही कायम मोठया किंवा लहान भावाच्या भूमिकेत नसतो हे शिवसेनेने लक्षात घेतले तर, दोन्ही पक्षांची नळावरची भांडणे संपतील आणि शिवसेनेची राजकीय परिपक्वता अधोरेखित होईल.